गुहागर : कंत्राटी शिक्षक भरतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी

गुहागर : कंत्राटी शिक्षक भरती बंद शासन निर्णयाचा पुनर्विचार करून कंत्राटी शिक्षकांची सेवा समाप्त न करता शासन निर्णयाप्रमाणेच कंत्राटी शिक्षक सेवा पूर्ववत सुरू ठेवावी. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शासनाकडे पाठपुरावा करून कंत्राटी शिक्षकांना न्याय द्यावा, असे निवेदन डी.एड., बी.एड. बेरोजगार संघटना शाखा गुहागरच्या वतीने मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना देण्यात आले.

मनसे तालुका संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे डी.एड… बी. एड. बेरोजगार संघटना शाखा गुहागरच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रमोद गांधी म्हणाले की, संघटनेच्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन या संदर्भात मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल. तसेच शिक्षकांना कायमस्वरूपी रोजगार कसा उपलब्ध होईल या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल. यावेळी सुमित मुंडेकर, समीर कुंभार, रोहित पटेकर, विप्रा पावस्कर, विभा गमरे, शुभांगी निंभोरे, सुनिती जांभारकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

२०२३ मध्ये साडेसातशे शिक्षक जिल्हा बदलीने गेले. त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्यात आले. यानंतर १ हजार ५०० शिक्षक पोर्टल भरतीने जून २०२४ ला आले व सर्व कंत्राटी शिक्षकांना काढून टाकण्यात आले. सप्टेंबर २०२४ ला साडेतीनशे शिक्षक बदली करून गेले. त्यानंतर पुन्हा ५०० कंत्राटी शिक्षक घेण्यात आले. आता पुन्हा पवित्र पोर्टल भरती सुरु आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 20/Feb/2025