राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळे गंगातीर्थ फाट्याजवळील अनधिकृत दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले आहे. तेथील अनधिकृत खोका हटवून पिकअप शेडचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी उन्हाळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे.
उन्हाळे गावातील महिलांनी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले आहे. तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे; मात्र महामार्गावर एसटी यांचे असलेल्या अनेक ठिकाणी पिकअप शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.
आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून काही एसटी पिकअप शेड मंजूर झालेल्या असून, काही शेडची कामेही पूर्ण झालेली आहेत. उन्हाळे गंगातीर्थ फाट्याजवळ पिकअप शेड व्हावी याकरिता उन्हाळे गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तिथे पिकअप शेड मंजूर झालो आहे; मात्र ज्या ठिकाणी शेड बांधण्यात येणार आहे तिथे अनधिकृत दुकानगाळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे शेड उभारण्यात अडचणी निर्माण होत आहेत, यावायत बांधकाम विभागाने संबंधित दुकानगाळा धारकाला पत्रव्यवहार करून दुकानगाळ्यांची शेड हटवा, अशी विनंती केली होती.
तसा ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामसभेतही अनधिकृत शेड हटविण्याचा ठराव करण्यात आला; मात्र अद्यापही अनधिकृत दुकानगाळा हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर उन्हाळे गावातील महिला ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत उपअभियंत्यांची भेट घेतली. तो अनधिकृत खोका तत्काळ हटवून पिकअप शेडचे बांधकाम करावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे. त्यामुळे आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 20/Feb/2025
