रत्नागिरी : प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी शिक्षण विभागाकडून क्षमता वृद्धी प्रशिक्षण दिले जात आहे; मात्र ऐन परीक्षांच्या तोंडावर मार्चअखेरीसच हे प्रशिक्षण वर्ग घेतले जात असल्यामुळे त्याचा फटका जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना बसत आहे. शिक्षक नसल्यामुळे काही शाळांवर कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या शिक्षकांना नियुक्त करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शिक्षक प्रशिक्षणात तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाऱ्यावर अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
सर्वच स्तरांतील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकक्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन केले आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत शिक्षकांना मार्गदर्शन दिले जात आहे. हे प्रशिक्षण चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन होते. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले असून, तालुकास्तरावरील प्रशिक्षण सध्या सुरू आहे. जिल्हास्तरावर मार्गदर्शन घेतलेले शिक्षक तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण घेत आहेत. एकीकडे दहावी, बारावी परीक्षांची गडबड सुरू असतानाच प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
त्यामुळे शिक्षकही त्रासलेले आहेत; परंतु शासनाचे आदेश असल्यामुळे शिक्षक आहे त्या परिस्थितीला सामोरे जात आहेत. माध्यमिकपेक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सुमारे साडेपाच हजार शिक्षक संख्या असल्यामुळे त्यांचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांची शिकवणी घेणे आवश्यक असताना शिक्षक प्रशिक्षणाला जात आहेत. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे अधिक असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशिक्षणाला गेलेल्या शिक्षकांच्या जागी कामगिरीवर नियुक्त्या करण्याची कसरत शिक्षण विभागाला करावी लागत आहे.
काहीवेळा तर दहापटापेक्षा कमी शाळांमध्ये नियुक्त केलेल्या डी.एड., बी.एड. धारक कंत्राटी शिक्षकांना कामगिरीवर काढून नियमित शिक्षकांच्या जागी पाठवले जात आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांच्या नुकसानीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. हे प्रशिक्षण मार्चपूर्वी न घेता अन्य वेळी घेतले असते तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नसते तसेच शिक्षकांचीही कसरत थांबवता आली असती, असे
काही शिक्षकांचे मत आहे.
शासनाने दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने डी.एड्. बी. एड्. धारक शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यातील काही शिक्षकांना मोठ्या पटाच्या शाळांमध्ये कामगिरीवर काढले. नियमानुसार कंत्राटी शिक्षकांना कामगिरीवर काढले जात नाही. जिल्ह्यात शंभरहून अधिक शिक्षकांची या पद्धतीने नियुक्ती केली. भविष्यात अशा नियुक्त्या केल्या तर तिथे कोणीही कंत्राटी शिक्षक हजर होणार नाहीत. – सुदर्शन मोहिते, जिल्हाध्यक्ष, डी.एड्. बी. एड्. धारक शिक्षक संघटना
प्रशिक्षण घेत असताना त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे गरजेचे होते मात्र त्या दृष्टीने जिल्हास्तरावरची परिस्थिती लक्षात घेतली गेली नाही. त्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. रिक्त पदांमुळे शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत होती. कामगिरीवर शिक्षक नियुक्त्याही कराव्या लागल्या. त्यात काही कंत्राटी शिक्षकांचीही नियुक्ती केली गेली होती- दिलीप देवळेकर,शिक्षकनेते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 20/Feb/2025
