रत्नागिरी: मध्य प्रदेशातील झाबुवा येथे खुनाचा गुन्हा करून फरार झालेल्या तीन संशयित आरोपींना पकडण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून, अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नेमकी कारवाई काय?
मध्य प्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार झाले होते. हे आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती झाबुवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, आरोपींना पकडण्यासाठी झाबुवा पोलिसांचे एक विशेष पथक रविवारी (०३ मे) रत्नागिरीत दाखल झाले.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. (Detection Branch) पथकाने तातडीने सूत्रे हलवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून या तिघांनाही शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
पोलीस रेकॉर्डनुसार अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी एकाच कुटुंबातील असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. दाऊद चिलिया वाकला २. नब्बु चिलिया वाकला ३. चिलिया कलिसिंग वाकला (सर्व राहणार: झाबुवा, मध्य प्रदेश)
पुढील तपास सुरू
हे तिन्ही आरोपी गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून झाबुवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या यशस्वी कारवाईमुळे रत्नागिरी पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परराज्यातील गुन्हेगार लपण्यासाठी कोकण किनारपट्टीचा वापर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली गस्त आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 04-05-2026














