रत्नागिरी : यंदा मुबलक हापूस आंबा उशिरा बाजारपेठेत येण्याची शक्यता

रत्नागिरी : बदलते हवामान आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले असून, सततच्या फळगळतीमुळे यावर्षी आंबा उशिराने बाजारपेठेत दाखल होईल, अशी भीती बागायतदारांमधून व्यक्त केली जात आहे.

हापूस आंब्याचे उत्पन्न चांगले मिळावे यासाठी आंबा बागायतदार लाखो रुपये खर्च करतात; मात्र दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका या बागायतदारांना बसतो. यंदाही तीच स्थिती आहे. आतापर्यंत चार ते पाचवेळा औषध फवारण्या झाल्या असून, पुढील पंधरा दिवसांत आणखी फवारण्या कराव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसांत कधी थंड तर कधी उष्ण वातावरण रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला आलेला मोहोर चांगलाच बहरला होता; मात्र अचानक उष्मा वाढल्याने मोहोर गळून जाऊ लागला आणि पुन्हा कलमांना पालवी फुटू लागली. आतापर्यंत तीनवेळा असे प्रकार झाले आहेत. दरवर्षी आंबा बाजारात येण्याचा पहिला टप्पा १५ मार्च ते २० मार्च असतो; मात्र या वेळी फारच कमी प्रमाणात आंबा येण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलांपासून वाचलेला आंबा बाजारपेठेत येईल. तिसऱ्यांदा आलेल्या मोहोरामुळे एप्रिल १० नंतर मुबलक आंबा बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.

यंदा हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या मोहोराची फळं काही प्रमाणात गळून गेली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आंबा वाढला आहे. तिसरा मोहोर आता आलेला आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी-जास्त झाले की, त्याचा आंब्यावर परिणाम होतो. अपेक्षित फळधारणा होत नाही तसेच फवारण्याही वाढत आहेत- जयवंत बिर्जे, आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 20/Feb/2025