देवरुख : ओझरे खुर्द येथील नव्या मोरीला भगदाड

देवरुख : देवरुख-सायले मार्गावरील ओझरे खुर्द येथील नव्याने उभारलेल्या मोरीला रस्त्याच्या मध्यभागीच भगदाड पडले आहे. ही मोरी बांधून केवळ दहाच दिवस झाले आहेत. यामुळे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवरुख-सायले हा मार्ग गतवर्षीच मंजूर झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. ओझरे खुर्द या गावात तीन ठिकाणी मार्गावर पावसाळ्यात पाणी साठत राहते. यामुळे या तीनही ठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार मोरी बांधण्यात आली. यातील पहिलीच मोरी मंगळवारी दुपारी फुटून मार्गाच्या मध्यभागीच मोठे भगदाड पडले आहे. संबंधित ठेकेदाराने याकडे लक्ष देऊन वेळीच मोरी दुरुस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.

या मोरीवरून गेल्यास अपघात होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मुळात दहा दिवसांपूर्वीच उभारण्यात आलेली मोरी तुटल्यामुळे या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरणही रखडले असून, यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 21/Feb/2025