नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. तालकटोरा स्टेडियममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
दुपारी साडेतीनला विज्ञान भवनात आयोजित होणाऱ्या उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर व स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसीय सोहळ्याच्या उद्घाटनाचे दुसरे सत्र सायंकाळी ६.३० वाजता होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे भाषण, तर संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.
संमेलनासाठी जादा निधी
पुणे : संमेलनाला महाराष्ट्र सरकारने एका दिवसात अतिरिक्त २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचा शासन निर्णय २० फेब्रुवारीला काढला. विशेष बाब म्हणून हा निधी जाहीर झाला. त्यामुळे दिल्लीतील २ कोटींचे संमेलन आता ४ कोटींचे झाले आहे.
सभामंडपांची नावे
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिराव फुले अशा महापुरुषांच्या नावे सभामंडप असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.
संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छुक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याचे संजय नहार यांनी सांगितले.
ग्रंथदिंडी आणि ध्वजारोहण
सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची उपस्थिती असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 21-02-2025
