मराठी भाषेच्या अंमलबजावणीसाठी टास्कफोर्स : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय होत असेल, त्रास दिला जात असेल, वापर होत नसेल तर त्यासाठी टास्कफोर्स तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी याची प्रभावी अंमलबजावणी करतील कारवाईचे अधिकारदेखील त्यांनाच दिले आहेत.

दर तीन महिन्याला याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी स्मार्टसिटीची आढावा बैठक घेण्यात आली. दोन अधिकारी या प्रकल्पासाठी काम करतील. अतिशय दर्जेदार काम होण्याच्यादृष्टीने सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. या वेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत म्हणून मराठी भाषा अंमलबजावणीसाठी टास्कफोर्स नेमले आहे तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २६ आणि २७ तारखेला भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १७ मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने किल्ला येथील शिवसृष्टीच्या कामाचे लोकार्पण होणार आहे. तिथेही विविध कार्यक्रम होतील. भविष्यात जिल्ह्यात सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. थिबापॅलेस येथील सुमारे २२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या थ्रीडी मल्टीमीडिया शोचा लोकार्पण सोहळादेखील पंधरा दिवसात होईल. त्याचे काम पूर्ण झाले असून चाचणी सुरू आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 21/Feb/2025