…तर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : आताच्या जगात मोबाईल या आधुनिक शस्त्रात जी ताकद आहे, तेवढी पोलिसांच्या बंदुकीतही नाही. नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असावी. कारण आजकाल काही समाज कंटकांकडून मोबाईलद्वारे थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात गुरुवारी दुपारी 12.00 वा. जिल्हा नियोजन समितीद्वारे प्राप्त 10 स्कॉर्पिओ गाड्या व 14 सी प्रहरी (ई-बाईक) तसेच व्हिजीटर मॅनेजमेंट सिस्टिम लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक धनश्री गायकवाड, राजापूरचे आ. किरण सामंत, गुहागरचे आ. भास्कर जाधव, शिवसेनेचे विलास चाळके आणि परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक निखिल पाटील उपस्थित होते. यावेळी आ. उदय सामंत म्हणाले की, मी यापूर्वी सिंधूदुर्ग व रायगडचा पालकमंत्री होतो. विभाग प्रमुखाची भूमिका जर सकारात्मक असेल तर त्याच्या विभागाचा कायापालट होतो. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी पोलिस विभाग होय. महाराष्ट्रात सर्वात जास्त घेतलेल्या आणि आम्ही दिलेल्या गाड्या या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आताच्या काळात गुन्ह्यांचा तपास आणि उकल करण्यासाठी पूर्वीच्या पद्धतींचा उपयोग होत नाही. आता गुन्हेगारांनाही कायदे आणि आपले अधिकार माहित आहेत. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना नवनवे तंत्रज्ञान विकसित करावे लागत आहे. पुर्वी पुढार्‍याने सांगितल्यानंतरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत होते. परंतु, आता जर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घेण्यात आला नाही किंवा फिर्यादीची काही तक्रार असेल तर तो ‘व्हीएमएस’ या प्रणालीद्वारे आपली तक्रार शासनाकडे नोंदवू शकतो. त्याच्या तक्रारीची दखल शासनाकडून तात्काळ घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री उदय सामंत, आ. भास्कर जाधव, आ.किरण सामंत आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी ऑनलाईन पद्धतीने ‘व्हीएमएस’ प्रणालीचा शुभारंभ केला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी श्रीफळ वाढवून व सर्व नव्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून त्यांचे उद्घाटन केले.

रत्नागिरीत 178 कोटींची पोलिस कॉलनी
आ. किरण सामंत, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि मी केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज 178 कोटींची पोलिस कॉलनी तयार होत आहे. ड्युटी संपल्यावर पोलिसांना निवांतपण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अशी चांगली पोलिस कॉलनी रत्नागिरीत तयार होत आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 21-02-2025