राजापूर कार्यालयातून ३८ हजार ५०० जणांना पासपोर्ट सेवा

राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर येथील पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयामुळे मागील सहा वर्षांपासून कोकणवासीयांच्या मुंबईवाऱ्या थांबल्या आहेत. आता हाच पासपोर्ट घरबसल्या ऑनलाईन अर्ज करूनही मिळू शकतो. त्यामुळे कोकणवासीयांची परदेशवारी अधिकच सुखद झाली आहे. गेल्या सहा वर्षांत राजापूर येथील पासपोर्ट कार्यालयातून ३८ हजार ५०० लोकांनी पासपोर्ट काढला आहे.

विविध कारण वा कामानिमित्ताने अनेकांना परदेशवारी करावी लागते. त्यासाठी पासपोर्ट अत्यावश्यक आहे. कोकणात पासपोर्ट कार्यालय नसल्यामुळे कोकणवासीयांना पासपोर्ट काढण्याठी मुंबई येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळेसह पैशाचाही अपव्यय होत होता. गेल्या काही वर्षांत परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आयटी, वैद्यकीय, हॉटेलसारख्या क्षेत्रात नोकरीची संधी अधिक असल्यामुळे अनेकजण परदेशामध्ये नोकरीसाठी जातात. कोकणवासीयांना पासपोर्ट काढण्यासाठी कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी होती. त्यानुसार १२ ऑगस्ट २०१८मध्ये राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाले. त्याचा उपयोग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या मध्यवतों टिवाण आहे. आता पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया आणखीनच सोपी झाला आहे.

पूर्वीसारख्या वाऱ्या न करता ऑनलाइन पद्धतीने पासपोर्ट काढण्यासाठी www.passportindia.gov.in या संकितस्थळावर अर्ज करावा लागतो. पासपोर्टसाठी त्या व्यक्तीचे आधारकार्ड, मतदार कार्ड किंवा छायाचित्र असलेला पुरावा आदी कागदपत्रांच्या सत्यप्रती तसेच मूळप्रती सादर कराव्या लागतात. ऑनलाइन अर्ज करताना सत्यप्रती जोडाव्या लागतात.

मुलाखतीवेळी मूळप्रती देणे आवश्यक आहे. कागदपत्रे पूर्ण असतील तर पोलिसांच्या पडताळणीनंतर १५ दिवसांत पासपोर्ट अगदी घरपोच पाठवला जातो. कागदपत्रे जमा करण्यासाठी मुलाखतीचा दिवस स्वतःच ठरवता येतो.

राजापूर पासपोर्ट कार्यालय हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पासपोर्ट काढण्यास इच्छुक असलेल्यांसाठी या ठिकाणी ये-जा करणे अधिक सुलभ आणि सोयीचे ठरत आहे. त्यामुळे कोकणवासीयांची परदेशवारी अधिक सुखद झाली आहे. पासपोर्ट काढण्यासाठी लोकांकडून प्रतिसादही चांगला मिळत असून, कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीसाठी दिवसभरामध्ये ८० लोकांची राजापूर पासपोर्ट कार्यालयामध्ये अपॉईंटमेंट असते. त्यापैकी सरासरी ६० ते ६५ जण उपस्थित असतात. – प्रल्हाद पेडणेकर, पासपोर्ट अधिकारी

कॅलिफोर्निया येथे नातेवाईक आहेत. त्यांना भेटण्यासाठी जाणार असून, त्यासाठी पासपोर्ट लागणार आहेत. राजापूर येथील कार्यालयामध्ये प्रशासकीय सेवाही चांगली मिळत असून, वयाच्या ६२व्या वर्षी मला पासपोर्ट मिळणार आहे. पासपोर्ट कार्यालय जवळ असल्यामुळे परदेशवारीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. परदेशातील नातेवाईकांना भेटताना तेथील प्रदेशासह जगही अनुभवता येणार असून, त्याचा निश्चितच आनंद होत आहे. – प्राजक्ता चोडणकर, सावंतवाडी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 21/Feb/2025