चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा जगात नाही की, ज्या राजाने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता सुरू केली. मध्य युगीन कालखंडात साम्राज्यवादी धोरण राबविले जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या हितासाठी राज्य केले. त्यामुळे असा राजा जगात होणे नाही, असे गौरवोद्गार शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी काढले.
चिपळूण तालुका मराठा समाजातर्फे शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात शिवजयंतीच्या निमित्ताने हे व्याख्यान झाले, यावेळी शिवसेना नेते व आ. भास्कर जाधव, मुख्याधिकारी विशाल भोसले, सतीश देशमुख, बाळा कदम, पत्रकार सतीश कदम, सुबोध सावंतदेसाई, संतोष सावंतदेसाई आदी उपस्थित होते. यावेळी अभ्यासपूर्ण मांडणी करताना डॉ. कोकाटे म्हणाले, ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली.
याची इतिहासात नोंद आहे. डॉ. आंबेडकर हे पत्रकार, समाजसेवक होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जगाच्या इतिहासात सापडणार नाही. शिवाजी महाराज हे क्रांतीचे प्ररेणास्त्रोत आहेत. त्यांच्या इतिहासातून अनेकांनी प्रेरणा घेतली. याची इतिहासात उदाहरणे सापडतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील इतकेच काय देश-परदेशातील काही इंग्रज राज्यकर्ते, अधिकारी यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेतल्याची नोंद आढळते. राजे, सरदार हे लढवय्ये असतात. ते तलवारबाजी किंवा युद्धात पारंगत असतात, तसे अनेकजण होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण म्हणजे ते रयतेचे राजे होते. त्यांनी आपले राज्य लोकांच्या कल्याणासाठी चालविले. त्यामुळेच त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते.
राज्य कारभार करताना त्यांनी अत्यंत बारीक गोष्टीचादेखील विचार केला. राज्याभिषेकापूर्वी त्यांचा चिपळूणजवळील दळवटणे येथे तळ होता. त्यावेळी त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले आदेशवजा पत्र आजही इतिहासाचे साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला वारसा पुढे शंभूराजांनी देखील चालविला. असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
महाराजांना कर्तृत्वावर विश्वास होता
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी पंचांग बघितले नाही. पौर्णिमा, अमावस्या पाहिली नाही. मात्र आज आपण लग्न ठरविताना पत्रिका बघतो, पंचांग बघतो, ग्रह बघतो. भूगोलतज्ज्ञांनी हे सर्व खोडून काढले आहे. ज्यावेळी हे ग्रह आपली कक्षा सोडतील त्यावेळी पृथ्वीच नष्ट होऊ शकते. त्यामुळे वास्तूशास्त्र, भविष्य यावर महाराजांनी विश्वास ठेवला नाही. मात्र, त्यांचा आपल्या कर्तृत्वावर विश्वास होता, असेही श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 21/Feb/2025
