मंडणगडमधील शिक्षक इस्त्रो अभ्यास दौऱ्यावर

मंडणगड : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, संशोधन वृत्ती वाढावी, या उद्देशाने मंडणगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या पाच दिवसांच्या इस्त्रो (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवता येईल, असा या दौऱ्यामागील उद्देश असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शिक्षण विभागाच्या या अनोख्या उपक्रमाला १७ पासून सुरुवात झाली. गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील २० शिक्षक या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन अंतराळ संशोधन, विज्ञान प्रयोग व महत्त्वाच्या स्थळांना भेटी देऊन भौगोलिक माहिती घेणार आहेत. दौऱ्याच्या समारोपानंतर सर्व शिक्षकांनी दौऱ्यात केलेला अभ्यास व तेथील अनुभव यांचे लिखाण करून त्यांची स्मरणिका मंडणगड पंचायत समितीच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा संकल्प आहे.

त्यातील शिक्षकांचे अनुभव व निरीक्षणाचा उपयोग भविष्यात विद्यार्थी व शिक्षकाना होणार आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. देशात शास्त्रज्ञ निर्माण होणे तसेच विविध विषयांत जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यार्थीदशेतच हे संस्कार देण्याच्या हेतूने रत्नागिरी जिल्हा परिषद निवड परीक्षा घेऊन इस्रो, नासा दौरे आयोजित केले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शास्त्रज्ञ व्हावेत, ही भावना शिक्षकांमध्ये रुजली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल.

शिक्षक सुसंस्कारित नागरिक निर्माण करत असल्याने त्यांच्या माध्यमातून अधिक प्रगल्भतेने हा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मंडणगड तालुक्याने पुढाकार घेत जिल्ह्यात पहिले पाऊल टाकले आहे. तालुक्यातील शिक्षकांनीही त्याला उत्स्फूर्तपणे सहयोग दिला आहे-नंदलाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 21/Feb/2025