साडवली : टिकलेश्वर देवस्थान परिसरातील ५० वर्षे प्रलंबित असलेले विद्युतीकरणाचे स्वप्न अखेर साकार झाले. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. ४५ लाखांच्या निधीतून या परिसरात विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.
आमदार निकम यांनी या कार्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी मंजूर झाल्याचे सांगितले. पालकमंत्री उदय सामंत तसेच महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे पा प्रकल्पाला गती मिळाल्याचे निकम यांनी सांगितले. ते म्हणाले, देवस्थान परिसरातील लोकांच्या भावनांना आणि अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी हे विद्युतीकरण केले जात आहे.
हे काम एकात्मतेचे प्रतीक मानले पाहिजे, या कार्याच्या माध्यमातून आपल्या भक्तांच्या सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भविष्यात असाच विकास होईल आणि तेथे अधिक चांगले कार्य होईल, तसेच टिकलेश्वर परिसराच्या ग्रामस्थांना आणि भक्तगणांना हे विद्युतीकरण एक नवीन ऊर्जा देईल. देवस्थान परिसरात आता रात्रीसुद्धा ग्रामस्थांना जाता येईल, टिकलेश्वर देवस्थानच्या उद्घाटनावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, बाळू ढवळे, वैभव पवार, नितीन भोसले, हुसेन बोबडे, मंगेश बांडागळे, राजा भेरे, भिकाजी चौगुले, संतोष कतळकर, सुभाष भायजे, सुभाष भोवसकर, बापू बडवे, राजू वाकुंद्र सहायक अभियंता सतीश कोकरे, ठेकेदार राहुल टाकाळे आदी उपस्थित होते.
पर्यटकांना पर्वणी
टिकलेश्वर हे देवरुखजवळचे देवस्थान आहे. सह्याद्रीच्या माथ्यावर खूप उंचीवरील एका शिखरावर हे मंदिर उभे आहे. दूरवर पसरलेल्या जंगलाने हा परिसर वेढलेला आहे. सह्याद्रीच्या अवघड दऱ्याखोऱ्यांत भटकणाऱ्या ट्रॅकर्स व गिर्यारोहकांनाही टिकलेश्वर परिसराचे खूप आकर्षण आहे. ठिकलेश्वर मंदिरासमोर निवाऱ्यासाठी काँक्रिटचे छप्पर असलेली जागा आहे. शिखराच्या थोडे खाली उतरून प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या पायवाटेवर काही गुहा व दगडात कोरलेली स्वच्छ पाण्याची टाकी आहे. डोंगराच्या शिखरावरून पूर्वेस मैमतगड दिसतो आणि मार्लेश्वरकडे जाणारी वाट दिसते. टिकलेश्वरच्या पायथ्यापासून पदभ्रमण करत जाऊन येण्यास ५ ते ६ तासांचा अवधी लागतो. टिकलेश्वराच्या पायथ्याशी तलावडे हे गाव देवरुखपासून ४ कि. मी. वर आहे. तिथून टिकलेश्वा डोंगर चढून जायला आता रस्ता आहे. त्यामुळे अनेक पर्यटक टिकलेश्वरकडे जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 21/Feb/2025
