खेड : कोकणातील थंडीचा जोर कायम आहे. या थंडीच्या दिवसात एक खास पदार्थ सर्वांच्या आवडीचा बनतो तो म्हणजे मोंगा किंवा पोपटी. मोंगा हे एक पारंपरिक कोकणी खाद्य आहे, जे थंडीच्या दिवसात बनवले जाते. या पदार्थाला रत्नागिरीच्या खेड, चिपळूण परिसरात ग्रामीण भागात मोंगा म्हणतात, तर रायगड परिसरात पोपटी म्हणून ओळखले जाते. पावट्याच्या शेंगा तयार झाल्या की कोकणातील शेतात या पार्ट्या रंगू लागतात.
मोंगा बनवण्यासाठी पावट्याच्या शेंगा, मका, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि मसाले वापरले जातात. काही ठिकाणी चिकन किंवा मटण, अंडी देखील वापरले जाते. हे सर्व पदार्थ एकत्र करून एका मडक्यात भरले जातात. मडक्याच्या तोंडावर भांबुर्डी या वनस्पतीचा पाला लावून तोंड बंद केले जाते. ते मडकं शेतात जमिनीवर उघडे ठेवून तोंड पुरून त्याला उष्णता दिली जाते.
त्या भोवती गवत, शेण आणि लाकडं जाळली जातात. जेव्हा ती जळतात, तेव्हा मडके तापते व आतील जिनस शेंगांमधील पाण्याची वाफ होऊन शिजतो. साधारण दोन ते तीन तासांनंतर मडके बाहेर काढले जाते आणि मग त्यातला मोंगा गरमागरम खाल्ला जातो. चार माणसे खातील एवढा एक मांसाहारी मोंगा बनवण्यासाठी सुमारे १ हजार रुपये खर्च येतो. तर शाकाहार आलेल्या लोकांसाठी पनीर अथवा काही भाज्या टाकून देखील मोंगा लावला जातो. मोंगा चवीला खूपच छान लागतो.
कोकणातील शेतकऱ्यांना मोंग्यातून हंगामी रोजगार
कोकणातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना पावटे लागवडी नंतर हंगामी रोजगार व हमी भाव मिळवून देणारा उपक्रम मोंगा किंवा पोपटी ठरू लागला आहे. गेल्या काही वर्षात पर्यटकांकडून मोंगा पसंत केला जात असून, त्याची मागणी वाढत आहे. शासनाने देखील त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दिवसाला वीस ते पंचवीस मडकी मोंगाची मागणी
मोंगा चवीला खूपच छान लागतो. तो मसालेदार आणि चविष्ट असतो. त्यामुळे त्याची चव वर्षभर खाणाऱ्याच्या जिभेवर रेंगाळत राहते. थंडीच्या दिवसात मोंगा खाण्याची मजाच काही और असते. त्यामुळे अनेक जण पावटे तयार व्हायची वाट बघत असतात. यावर्षीचा हंगाम आता सुरू झाला असून आमच्याकडे दररोज वीस ते पंचवीस मडकी मोंगा लावला जात आहे, अशी माहिती खेड मधील एका शेतकऱ्याने दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 21/Feb/2025
