चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील १६ कातभट्ट्या वनविभागाने सील केल्या आहेत. कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली.
खैराच्या झाडावर प्रक्रिया करून त्यापासून कात बनवला जातो. वर्षानुवर्षे जिल्ह्यात हे व्यवसाय सुरू आहेत. त्यातही चिपळूण तालुक्यात खैर लागवड आणि कातभट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. वनविभागाने तेथेही अनेक ठिकाणी छापे टाकून कातभट्ट्या बंद केल्या आहेत. पर्यावरणाच्या मुद्यावरुन खैर तोडीवर निर्बंध आहेत. ते कात भट्ट्यांसाठीच तोडले जात असल्याने अशा भट्ट्यांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. चिपळूणसह दापोली आणि राजापूर तालुक्यातील कातभट्या बंद करण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील दोन कातभट्ट्यांवर खैराचा अवैध साठा आढळला होता त्या कंपन्या नाशिक येथील वनविभागाने सील केल्या होत्या. शासनाचे आदेश आल्यानंतर तीन कंपन्या बंद करण्यात आल्या.
राजापूर तालुक्यात एकूण चार कातभट्ट्या होत्या. यापैकी दोन कातभट्ट्या गेली काही वर्षे बंद आहेत. राजापूर शहरानजीक उन्हाळे आणि मठ खुर्द येथे दोन कातभट्ट्या सुरू होत्या. त्या बंद करण्यात आल्या आहेत. दापोली कार्यालयाच्या अंतर्गत मंडणगड, खेड, दापोली येथे सुरू असलेल्या कातभट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत.
पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार वनविभागाने सर्वच कातभट्ट्या बंद करण्याचे आवाहन व्यवसायिकांना केले आहे. -गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण
बंद केलेल्या कातभट्ट्या
चिपळूण – ५
दापोली – ६
राजापूर – ५
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 21-02-2025
