रत्नागिरी : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर भात खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ९७१ शेतकऱ्यांकडील २०.९०३ क्विंटल भाताची खरेदी झाली आहे. भात खरेदीनंतर जिल्ह्यातील १३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १२ लाख ५३ हजार ९०७ रुपये जमा झाले आहेत.
जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. शेतकऱ्यांनी स्वतःपुरते भात ठेवून उर्वरित भात विक्रीतून पैसे मिळावेत यासाठी शासकीय धान्य खरेदी केंद्रावर भात विक्रीची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताला हमीभाव जाहीर केला आहे. गतवर्षी जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४३ हजार क्विंटल भात खरेदी केली होती. यावर्षी ५५ हजार क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ३१ मार्चपर्यंत भात विक्री करण्याची मुदत दिली आहे.
भात विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील एकूण ९७१ शेतकऱ्यांनी भात विक्री केली असली तरी आतापर्यंत १३ शेतकऱ्यांच्याच खात्यावर भात विक्रीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. अलीकडे गेली काही वर्षे सरकारकडून दर चांगला मिळत असल्याने भात विक्रीसाठी शेतकरी चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी चिपळूण केंद्रावर झाली आहे.
यावर्षी २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर शासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. यावर्षी ५५ हजार क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या केंद्रांवर भात खरेदी सुरू
जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये खेड, दापोली, केळशी, रत्नागिरी, लांजा, चिपळूण, मिरवणे, आकले, शिरगाव, राजापूर या केंद्रांचा समावेश आहे. आतापर्यंत २०.९०३ क्विंटल भात खरेदी झालेली आहे. गुहागर केंद्र वगळता अन्य केंद्रांवर भात खरेदी सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 22/Feb/2025
