लांजा : दारु पिण्यावरुन पती-पत्नीत वाद झाल्यामुळे पत्नीने रागातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचुर्टी हुंबरवणेवाडी येथे गुरुवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याबाबतची फिर्याद संबंधित महिलेच्या पतीने लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील चिंचुर्टी हुंबरवणेवाडी येथील अजित बबन जाधव (वय ३२) व त्याची पत्नी आराध्या अजित जाधव (वय ३१) हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. अशातच २० फेब्रुवारी गुरुवार रोजी पती अजित जाधव हे घरात दारू प्यायल्याने पत्नी आराध्या आणि अजित यांचे जोरात भांडण झाले. दोघांच्यात भांडण झाल्याने रागाच्या भरात आराध्या जाधव हिने गुरुवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:१५ ते ४:३० च्या सुमारास घरात कोणी नसताना स्वयंपाक खोलीत लाकडी भालाला नायलॉन रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदरचा प्रकार पती अजित जाधव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात खबर दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेड कॉन्स्टेबल एस.एस. भुजबळराव हे करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 22-02-2025
