रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, रत्नागिरी तालुक्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय होत नाही. तरीही इतर ५ तालुक्यांमधील ४१ तळींमध्ये होणारे मत्स्य उत्पादन वाढत आहे. त्यामुळे हे मत्स्यउत्पादन मोजणारा कर्मचारी कुशल असणे आवश्यक आहे. सद्या हे मत्स्यउत्पादन सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या सागर मित्रांकडून करून घेतले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायासाठी ४१ तळी, सरोवरे, जलाशये अनुकूल आहेत. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागातील माहितीनुसार जिल्ह्यातील ९ पैकी मंडणगड, दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय होत नाही. सन २०२३-२४ मध्ये खेड, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातील एकूण मत्स्यउत्पादन १८७. ८० मे. टन झाले. सन २०२२-२३ मध्ये हेच उत्पादन ३४.५० मे. टन इतके झाले होते. परंतु मत्स्यउत्पादन मोजण्यासाठी कुशल किंवा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नसल्याने या उत्पादनाच्या प्रमाणाबाबत खात्री देता येत नाही. सागरी मत्स्यउत्पादन मोजण्यासाठी शासकीय सांख्यिकी विभागातील कर्मचारी प्रत्येक मासळी उतरविण्याच्या केंद्रावर जाऊन मोजमाप घेतात.
रत्नागिरी जिल्ह्याला १६५ कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचवेळी ५९५ कि.मी. लांबीच्या नद्या आहेत. नद्यांची लांबी सागरी लांबीपेक्षा मोठी असली तरी सागरी मत्स्यउत्पादनापेक्षा गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन तुलनेने फारच कमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील किंवा खाऱ्यापाण्यातील माशांना पसंती दिली जाते. त्यामुळे गोड्या पाण्यातील मासळी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरला जाते. कटला, रोह, मृगल आदी गोड्या पाण्यातील मासळीचे रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय विभागाला केल्या आहेत. परंतु या कामासाठी कुशल किंवा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या सागर मित्रांकडून या मासळी उत्पादनाची मोजमापे घेतली जात आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन आणि मोजमापात तफावत राहण्याची शक्यता आहे.
वर्षभरात खेडमध्ये सर्वाधिक उत्पादन
नुकत्याच संपलेल्या वर्षामध्ये खेडमध्ये सर्वाधिक ५५.२० मे. टन गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन घेतले गेले आहे. गुहागरमध्ये ४८.१० मे. टन, संगमेश्वरात १९.९० मे. टन, लांजात ४७.९० मे. टन आणि राजापूर तालुक्यातून १६.७० मे. टन असे एकूण १८७. ८० मे. टन मत्स्यउत्पादन झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 24/Feb/2025














