रत्नागिरी : येथील जीजीपीएसच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवीच्या मुलांसाठी ‘नाईट कॅम्प उपक्रम’ उत्साहात घेण्यात आला.
अश्विनी तांबे यांनी जर्मन भाषेतील हलकाफुलका संवाद बोलण्याचा सराव घेत मुलांना जर्मन भाषेतील १ ते १० अंक आणि रोजच्या व्यवहारातील वाक्य बोलण्याचं प्रशिक्षण दिलं, मुल यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. यानंतर प्रा. बाबासाहेब सुतार आणि गुर्जर यांनी जवाहर मैदानावर मुलांना ग्रहताऱ्यांची माहिती दिली आणि दुर्बिणीतून त्यांचे निरीक्षण करण्याची संधी प्रत्येक मुलाला उपलब्ध करून दिली. मृग नक्षत्र, गुरु ग्रह, त्यांचा आकार, प्रकाशाचा त्यांच्या आजूबाजूचे हारे याबद्दल माहिती दिली.
शेकोटीभोवती गाणी, नृत्य आणि विविध खेळ घेण्यात आले. गप्पागोष्टी, विनाद करत रात्र कधी संपली मुलांना कळलंच नाही. सकाळी साडेपाचला मुलांनी शाळा भाठे सुरुबन मॉर्निंगवॉक केल्यावर समुद्रकिनारी वाळूत श्रद्धा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने, प्रार्थना केली, सूर्योदयानंतर मुलांनी कबड्डी, खो-खो, पकडापकडी खेळांचा आनंद घेतला. यानंतर शाळेमध्ये शिवजयंती साजरी करताना आपल्या अभिनयाचे उत्तम प्रदर्शन करत चैत्राली कुलकर्णीने अफझलखानाचा वध ही नाट्यछटा सादर केली, राघव पाध्ये याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची माहिती सांगितली. या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 28/Feb/2025













