कुवारबावच्या समस्यांबाबत ११ मार्चपासून उपोषणाचा इशारा

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असलेल्या कुवारबाववासीयांच्या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने कुवारबाव येथील संतप्त नागरिकांनी ११ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

कुवारबावमधील २३ गृहनिर्माण संस्थांचे सुमारे ७५० भूखंड त्यांच्या नावावर करण्यासाठी अकारफोडची अंमलबजावणी करणे, कुरण या चुकीच्या नावाखाली ३० झोपडीधारकांचा अडवलेला घरकुल प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, घनकचरा व FSTP साठी गावातील ८० गुंठे जमीन त्वरित ग्रामपंचायतीला हस्तांतरित करणे आणि कारवांचीवाडी येथील रस्ता,अपघाती मृत्यू होऊनही न करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे या प्रमुख चार मागण्या गेली अनेक वर्षे कुवारबाव येथील नागरिक करत आहेत; मात्र जिल्हा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले आहेत.

यासंदर्भात कुवारबाव येथील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. “भाजपा पदाधिकारी आंदोलन पत्र देण्याआधी माझ्याकडे आले असते तर मीच प्रश्न सोडवले असते”, असे पूर्वी म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी फोन उचलला नाही तसेच स्वीय सहायकाकडे पाठवलेला निरोपही ऐकला नाही.

हे सर्व प्रश्न नागरिकांचे जिव्हाळ्याचे असल्याने व कित्येक वर्षे प्रलंबित ठेवल्याने नाइलाजाने सर्वांनी ११ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, पत्रकार संस्थेतील मान्यवर अतिक पाटणकर, महिला तालुकाध्यक्षा सौ. प्रियल जोशी, दीपक आपटे, प्रशांत जोशी, शामराव माने यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 28-02-2025