रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासनाला मिळणार हक्काची इमारत

रत्नागिरी : १९७२ सालापासूनच भाड्याच्या जागेत कामकाज सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाला तब्बल ५३ वर्षांनंतर हक्काची इमारत मिळणार आहे. शहरानजीकच्या कुवारबाव गणेशनगर येथे आरटीओ कार्यालयाच्या जवळच या कार्यालयाची दुमजली टुमदार इमारत उभी राहात आहे. सुमारे सात कोटींच्या निधीतून या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे.

खाद्यपदार्थ, विविध पेये यांच्यात विक्रेत्यांनी भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करू नये, तसेच अवैध औषधांचा वापर किंवा विक्री होऊ नये, यासाठी या कार्यालयाकडून नियंत्रण ठेवले जाते. यांच्याशी संबंधित व्यवसायासाठी या विभागाचा अधिकृत परवाना किंवा नोंदणी करून घेतल्यानंतरच विक्रेत्याला संबंधित व्यवसाय करता येतात. व्यवसाय केल्यानंतरही सुरू त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हक्काची जागा प्रशासन काम करत असते.

रत्नागिरीत १९७२ साली या विभागांचे कार्यालय भाड्याच्या जागेत सुरू झाले. त्यानंतर कार्यालयाची जागा अनेक वेळा बदलली तरीही ती भाड्याच्या जागेतच होती. त्यामुळे या अपुऱ्या जागेत दोन विभागांचे कामकाज अतिशय अपुऱ्या जागेत करताना अडचणी येत होत्या. सध्या हे कार्यालय जलप्राधिकरण विभागाच्या कार्यालयात भाड्याने आहे. मात्र, या इमारतीचीही आता दुरवस्था होऊ लागली आहे. अन्न त औषध प्रशासनाच्या कामाचा आवाका पाहता स्वतंत्र इमारत आवश्यक होती.

अखेर या विभागासाठी सुमारे सात
कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर कुवारबाव गणेशनगर येथे शासकीय जागा मिळाली. त्यानंतर या कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. दुमजली टुमदार अशा या इमारतीच्या बांधकामाला गती येऊ लागली आहे. त्यामुळे ५३ वर्षांनंतर का होईना अन्न व औषध प्रशासनाला आपली हक्काची इमारत मिळणार आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग आणि गोडाऊन, पहिल्या मजल्यावर आस्थापना आणि औषध प्रशासन विभाग, तर दुसऱ्या मजल्यावर अन्न प्रशासन विभाग आणि दोन्ही विभागांच्या बैठकांसाठी सभागृह अशी रचना आहे. लवकरच या इमारतीचे काम पूर्णत्वाला जाऊन अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 01/Mar/2025