लांजा : भूजल पातळीत होणारी घट लक्षात घेता तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन लांजा पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यात ६०० बंधारे बांधण्याचा संकल्प केला होता. ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. आतापर्यंत ३०२ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. पन्नास टक्के उद्दिष्ट साध्य झालेले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांनी दिली.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी लांजा पंचायत प्रशासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो; मात्र तालुक्यातील पाणीटंचाई कमी झालेली नाही. टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांच्या संख्येत थोडी घट झाली असली तरीही एप्रिल, मे ते जूनचा पहिला आठवडा या कालावधीत तालुक्याच्या ग्रामीण भगात अद्यापही पाणीटंचाईची झळ बसत आहे.
महिलावर्गाला एका एका हंड्यासाठी दूरवरून पाण्यासाठी पायपीट करावे लागते. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊनही पाणीटंचाई दूर होत नसेल तर लाखो रुपये खर्चुन नेमके काय साध्य होते, असा प्रश्न पडत आहे. दरवर्षी तालुक्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये पाण्याची कमतरता जाणवू लागते. हे टाळण्यासाठी लांजा पंचायत समिती प्रशासनाने पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत बंधारे बांधण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. तालुक्यात श्रमदानातून ६०० बंधारे बांधण्यात येणार होते.
प्रत्येक ग्रामपंचायतीला दहा बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिलेले होते. लोकसहभागातून आणि श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात येत आहेत. या बंधाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील गावांमधील पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल अशी आशा आहे.
तालुक्यात डिसेंबरअखेर ३०२ बंधारे बांधले गेले आहेत. त्यामध्ये वनराई बंधारे ६४, विजय बंधारे १३३ आणि कच्चे बंधारे १०५ आहेत. हे बंधारे बांधण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बचतगट महिला, अंगणवाडी कर्मचारी, स्थानिक नागरिक, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामसेवक, कर्मचारी, अधिकारी यांचा सहभाग आहे. या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची झळ कमी होईल, असा अंदाज पंचायत समितीकडून व्यक्त केला जात आहे.
कोलधेत बांधले दहा बंधारे
बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टापैकी केवळ कोलधे या एकमेव ग्रामपंचायतीने १० बंधारे बांधले गेले आहेत. त्या पाठोपाठ कुर्णे ग्रामपंचायतीने ९ बंधारे बांधून पूर्ण केले. रिंगणे, कोचरी आणि तळवडे या तीन ग्रामपंचायतींनी प्रत्येकी आठ बंधारे बांधले. त्या खालोखाल मठ, प्रभानवल्ली, व्हेळ, निवसर, पन्हळे, हर्चे, आसगे, कोट, कोर्ले, मठ, जावडे आणि रावारी या १२ ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ७ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. उर्वरित ४३ पैकी काही ग्रामपंचायतींनी ३, ४ तर काही ग्रामपंचायतींनी ५ तर काही ग्रामपंचायतींनी ६ याप्रमाणे बंधारे बांधले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 04/Mar/2025













