चिपळूण : देवरहाटीच्या जमिनीवरील देवस्थानाचा ताबा बेकायदेशीरपणे कमी करून त्या जागी महाराष्ट्र शासन असे नाव नोंद केले गेले आहे. या विरोधात येथील प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी चिपळूण, खेड आणि गुहागर तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे वक्फ बोर्ड हिंदुच्या जमिनीवर हक्क सांगत असून पिढ्यानपिढ्या पूर्वजांनी देवस्थानाला दिलेल्या जमिनी शासनच बेकायदेशीरपणे ताब्यात घेते. शासनाने अशा पद्धतीने त्या जमिनी ताब्यात घेणे ही हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का देताना संविधानाने दिलेल्या धार्मिक अधिकारांवर घाला घालणारे आहे, अशी टीका महाराष्ट्र शासनाने चालू अधिवेशनात करण्यात आली.
देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी या आंदोलनातर्फे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जिल्हाभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासन आणि प्रशासनाला दिला. निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक अभय महाराज सहस्रबुद्धे, जिल्हा सहसंयोजक चंद्रकांत कदम, प्रमोद निवळकर, कुंभारखाणी देवस्थानचे विकास सुर्वे, कुटरे देवस्थानचे विशाल परकर, गुढे देवस्थानचे दीपक मोरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संघटक सुरेश शिंदे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 07/Mar/2025













