मुंबई : मराठी अभिजात भाषा दिवस | मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली.
या निर्णयाचे राज्यभरात स्वागत होत आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही या निर्णयाचा आनंद व्यक्त केला. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिली आहे.
आता यापुढे ३ ऑक्टोंबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, मी, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने अत्यानंद व्यक्त केला. जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव करण्यात आला, असं या पोस्टमध्ये म्हटले आहेत.
“3 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला, असंही यात म्हटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेला निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. सर्व भारतीय भाषांचा वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे काम भाषा करत आहेत, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. अभिजात भाषा अशी नवी वर्गवारी निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने १२ ऑक्टोबर २००४ साली घेतला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:33 04-10-2024