संगमेश्वर : कडवईत जलजीवन मिशनची कामे थंडावली

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे गेली दोन वर्षे सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत. जलजीवन मिशन अंतर्गत कडवई गावात अनेक ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या वर्षी सुरू झाले परंतु अचानक ते थांबविण्यात आले. यंदा त्या कामाला गती मिळेल, असे वाटत असतानाच काम पुन्हा एकदा बंद झाल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागेल, अशी परिस्थिती आहे.

कडवई मादगेवाडी, रोहिदासवाडी योजनेच्या विहिरीचे काम गेल्यावर्षी केले. परंतु या कामात नीट लक्ष न दिल्याने आता विहिरीतील जलस्रोत आटू लागला आहे. उजगावकरवाडी, कुंभारवाडी, शिंदे आंबेरी, यादववाडी, धामणाकवाडी विकासनगर या वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कडवईत एवढे मोठे धरण असूनही व्यवस्थित नियोजन नसल्याने लोकांचे पाण्यावाचून हाल होतात.

उन्हाळ्यात नागरिकाना गैरसोय सोसावी लागेल
या धरणाजवळ बांधलेल्या टाक्या आता जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. टाक्यांच्या गळतीमुळे वीज बिलात वाढ आहे. आधी पाणी कमी त्यात वाढीव बिलाचा भार सोसावा लागत आहे. आता होळीचा सण जवळ आला आहे. चाकरमानी गावात येतात. अश्यावेळी पाण्याचे संकट उभे राहिले आहे. या जलजीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण न केल्यास उजगावकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 08/Mar/2025