अनिष्ठ प्रथेतून महिलांना सन्मान देण्याचा ध्यास : वैदेही सावंत, चक्रभेदी संस्था

साखरपा : एकविसाव्या शतकात अनेकवेळा महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. कितीही कायदे झाले तरीही आजही महिलांबाबतच्या अनिष्ठ प्रथा समाजात सुरू आहेत. या सगळ्यांबाबत आवाज उठवत महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी वैदेही सावंत यांची चक्रभेदी संस्था लढा देत आहे. विधवा आणि एकल महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून अनिष्ठ प्रथांना दूर करण्याचा विचार जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सुमारे ६० हजार महिलांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.

देवरूखच्या साडवली येथे राहणाऱ्या वैदेही सावंत या उच्चशिक्षित. एमए, बीएड, एम.फिल. अशा पदव्युत्तर पदव्या त्यांच्या नावावर आहेत. सुरुवातीला शिरगावच्या रयत शिक्षणसंस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी काही काळ अध्यापन केले. अंगणवाडी प्रशिक्षण कोर्सच्या त्या केंद्र संचालिकाही होत्या. पुणे येथील यशदा, हैदराबाद येथील एनआयआरडी, नाबार्ड अशा नामांकित संस्थांच्या माध्यमातून पंचायतराज, गावविकास अशा विषयांवर त्यांनी काम केले. राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे, पाणी फाउंडेशन अशा विषयात त्यांनी काम केले. हे सगळे सुरू असताना त्यांचा अनेक गावांशी आणि विशेषतः तिथल्या महिलांशी संपर्क आला.

ग्रामीण भागातील महिलांची स्थिती, त्यांचे समाजातील आणि कुटुंबव्यवस्थेतील स्थान हे सावंत यांनी जवळून पाहिले. ग्रामीण भागातील महिलांना येणाऱ्या समस्या, त्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या रुढी-परंपरा यांची जाणीव सावंत यांना झाली. आजही ग्रामीण भागातील महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचे वास्तव सावंत यांच्या निदर्शनास आले.

आजही खेडेगावातील महिला या अनिष्ठ प्रथांना बळी पडत असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यातूनच काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. ही प्रेरणा घेत त्यांनी चक्रभेदी सोशल फाउंडेशनची स्थापना केली. विधवा आणि एकल महिलांना मंगलकार्यात सन्मानाची वागणूक मिळत नाही. अशा महिलांना समाजात डावलले जाते. याविषयी त्यांनी चक्रभेदीच्या माध्यमातून काम केले. अशा महिलांचे हळदी-कुंकू त्यांनी आयोजित केले. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सुमारे ६० हजार महिलांपर्यंत हा विचार त्यांनी पोचवला. चक्रभेदी संस्थेतर्फे त्यांनी ठिकठिकाणी जाणीव जागृती कार्यक्रम घेऊन महिलांच्या अनिष्ट प्रथांविरोधात आवाज उठवला. अशा प्रथा नष्ट करणे, समाजातील भेदभाव संपवणे यासाठी त्या काम करत आहेत. शिव्यामुक्त समाज हे विशेष अभियान चक्रभेदीतर्फे सावंत यांनी राबवले. खेडेगावातील स्थलांतर आत्मनिर्भर समाज बनवणे यावरही त्या काम करत आहेत.

जीवनकौशल्य कार्यशाळा त्या आयोजित करतात याशिवाय पर्यावरण संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरवणे, शेअरिंग-केअरिंग असे उपक्रम चक्रभेदीकडून राबवले जातात. महितांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे. ती मिळत नाही तोपर्यंत समाज सक्षम होणार नाही. अनिष्ठ प्रथांमध्ये महिलांना अडकवून ठेवल्यास समाज सुधारणा होणार नाही. त्यासाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे उपक्रम राबवले जातात. – वैदेही सावंत, चक्रभेदी संस्था

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 08/Mar/2025