चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण ९ महिन्यांत शंभर टक्के पूर्ण होईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १३ वर्षांत महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तब्बत १५ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग राज्यासाठी वाहतूक, पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. तब्बल १५,६०० कोटी रुपयांचा खर्च, ४६० से ४७१ किलोमीटर लांबी आणि १३ वर्षांची प्रतीक्षा यानंतर अखेर हा महामार्ग पूर्णत्वास जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला १३ वर्षा पूर्वी सुरुवात झाली होती. रस्त्याचे चौपदरीकरण करताना अनेक अडचणी आल्या. १३ वर्षानंतर का होईना अखेर हा मार्ग पूर्ण होणार आहे. मात्र, त्यासाठी अजून ९ महिन्यांची वाट बघावी लागणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होईल असा प्रश्न शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारला होता. त्याला सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लेखी उत्तर दिले. या महामार्गाचे शिल्लक काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे, तसेच इंदापूरकडे जाणारा पूल डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होईल.
हा महामार्ग एकूण ११ टप्प्यांत बांधला जात आहे. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या भागांचे चौपदरीकरण, पूल बांधणी, उड्डाणपूल आणि बोगदे यांचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण महामार्गाचा विकास टप्प्याटप्प्याने होत आहे आणि कामाचा वेग वाढवला गेला आहे. महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ५ ते ६ तासांत पूर्ण करता येईल, जो सध्या १३ तास घेतो. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. महामार्ग अधिक सुरक्षित आणि वेगवान असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल.
कशेडीतील दुसरा बोगदा लवकरच सुरू
पनवेल ते कासूदरम्यान ४२.३ किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या पुलांचे आणि उड्डाणपुलांचे काम चालू आहे. मुंबई-गोवा महामार्गातील सर्वात मोठ्या अडचणींपैकी एक म्हणजे कशेडी घाटातील वाहतूक कोंडी. या समस्येवर तोडगा म्हणून महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग म्हणून दोन बोगदे बांधले आहेत. यापैकी एक बोगदा आधीच वाहतुकीसाठी खुला केला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिलअखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 10/Mar/2025














