चिपळुणातील मटण-मच्छी मार्केटची दुरवस्था

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने वीस वर्षांपूर्वी उभारलेल्या मटण-मच्छी मार्केटची दयनीय अवस्था झाली असून सुमारे वीस वर्षाच्या कालावधीत या इमारतीचा वापर न झाल्याने नव्याने बांधलेली इमारत भंगाराचे गोडावून असल्यासारखी भासू लागली आहे. शहरात विविध मोकळ्या जागांवर सध्या काही ठिकाणी मच्छी विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. मात्र, मध्यंतरात न.प. च्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत. पर्यायी जागा म्हणून या मटण-मच्छी मार्केटमध्ये न.प.ने जागा उपलब्ध केली असली तरी इमारतीच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी जाण्यास विक्रेते तयार नाहीत.

सुमारे २० वर्षांपूर्वी त्या काळात काही लाख रुपये खर्च करून मटण आणि मच्छी मार्केटची इमारत उभारण्यात आली. मात्र, इमारतीचे काम बऱ्याच अंशी रखडल्याने या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध गाळे लिलावाने घेण्याकडे पाठ फिरवली. सुमारे वीस वर्षे ही इमारत पूर्ण करणे, त्यातील त्रुटी दूर करणे व डागडुजी, देखभाल करणे
असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. परंतु व्यावसायिकांनी या ठिकाणी जाण्यास नकार दिल्यामुळे इमारतीची दुरवस्था होत आहे.

तीन वर्षांहून अधिक काळ व त्याहीपूर्वी न.प.तील लोकप्रतिनिधी, सत्ताधाऱ्यांनी या इमारतीला ऊर्जितावस्था देण्याचा काहीअंशी प्रयत्न केला. मात्र, त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत या इमारतीची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. गाळ्यांचे शटर मोडकळीस आले आहे. तसेच आर.सी.सी. स्ट्रॅक्चर, भिंतीचे प्लॅस्टर, इमारतीच्या छतावरील पत्रे एकूणच स्थिती दयनीय झाली आहे. संपूर्ण इमारत परिसरात अस्वच्छता आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये मटण व मच्छी विक्री कशा पद्धतीने करायची? हा गंभीर प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे. अशा इमारतीमध्ये व्यवसाय केल्यास त्याचे आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतात.

दरम्यान, अशा एकूणच घटकांमुळे व्यावसायिकांनी त्या इमारतीमध्ये व्यवसाय करण्यास नकार दर्शविला आहे. तसेच इमारतीची योग्य देखभाल राखून आवश्यक त्या दुरुस्ती तातडीने कराव्यात, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 17/Mar/2025