रत्नागिरी : जिल्ह्यातील २२ बसस्थानकांत सीसीटीव्ही बसवणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

खेड : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्या दृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २२ बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. यावेळी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकामध्ये स्वच्छता राखावी अशा सूचना देखील केल्या, खेड बसस्थानकाचे १६ रोजी ना. योगेश कदम यांच्या हस्ते व ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले.

या कार्यक्रमाला विभाग नियंत्रक प्रजेश बोरसे, तहसीलदार सुधीर सोनवणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, शशिकांत चव्हाण, अरुण कदम, सचिन धाडवे, कुंदन सातपुते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, सर्वसामान्य जनता एसटीमधून प्रवास करत असते. त्यामुळे सर्वांना एसटीबद्दलची एक वेगळी आपुलकी आहे. एसटी बसस्थानक सुसज्ज असणे, एसटी स्वच्छ असणे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर करुन घेतला. यामधून सुसज्ज असे बसस्थानक उभे राहील. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी मिनी बसेस देण्याच्या मागणीसाठी आपण जिल्ह्यातील सर्व आमदारांसह परिवहन मंत्र्यांची भेट घेऊ आणि पुढील सहा महिन्यात मिनी बसेस उपलब्ध करुन घेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिलांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या २२ बसस्थानकांमध्ये सौसीटीव्ही लावण्यात येत आहे. सुरक्षिततेबरोबर असेही ते म्हणाले. आरोग्यही फार महत्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने एसटी बसस्थानकातील सर्व शौचालयेही स्वच्छ असणे गरजेचे आहे. बसस्थानक स्वच्छ ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या मागणीनुसार खेड येथील क्रीडांगणासाठीही निधी देण्यात येईल.

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, खेड बसस्थानक एक नवं स्वरूप घेणार आहे. याचे समाधान आहे. या बसस्थानकामुळे नागरिकांचा त्रास, समस्याही दूर होणार आहेत. येथे बसस्थानक होत असल्याने आता मैदानाची गरज भासणार आहे. पालिकेच्या क्रीडांगणसाठी आरक्षित भूखंडसाठी जिल्हा नियोजन मधून निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

भौगोलिक परिस्थिती पाहता या भागामध्ये मिनी बसेस आवश्यक आहेत. नवीन बसेस घेत असताना त्याबरोबर मिनी बसेसही घ्याव्यात, यासाठी आपण पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 17/Mar/2025