पावसमध्ये नवलादेवीचा शिमगोत्सव उत्साहात

पावस : पावस गावची ग्रामदेवता नवलादेवीची होळी वाजतगाजत, गुलाल आणि फुलांची उधळण करत शुक्रवारी (ता. १४) रात्री पावणेनऊ वाजता उभी करण्यात आली. त्यानंतर होम पेटवण्यात आला. होळी उभी राहिल्यावर ग्रामस्थांनी जल्लोष करत देवीच्या नावाचा जयघोष केला.

पावसची ग्रामदेवता श्री नवलादेवी हिची रूपे लागल्यानंतर पालखीत बसून गावामध्ये भक्तांच्या भेटीला सुरवात केली. भक्तांच्या भेटी घेत असताना गुरुवारी होळीच्या दिवशी पावस बाजारपेठेमध्ये गोळप येथील श्री देव रवळनाथ व पावस येथील श्री नवलादेवी या बहीण-भावांची परशुराम मंदिराजवळ भेट झाली. या वेळी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.

शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरमाडाची होळी तोडण्यात आली. ती पावस चौकात वाजतगाजत आल्यानंतर होळीवर जेसीबीवरून फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर होळी नाचवत बौद्धवाडीमार्गे तांबळवाडीवरून मंदिराकडे मार्गस्थ झाली. रात्री पावणेनऊ वाजता मंदिराजवळ होळी उभी करण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा करून होम करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 17/Mar/2025