चिपळूणात अतिक्रमणविरोधी फिरते पथक कार्यरत

चिपळूण : आठ दिवसांपूर्वी चिपळूण नगर परिषद प्रशासनाने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण विरोधात केलेल्या कारवाईचे स्वागत नागरिकांकडून होत असतानाच दुसरीकडे अतिक्रमणे पुन्हा उभी राहू नयेत यासाठी प्रशासनाने फिरते पथक कार्यरत ठेवले आहे. सकाळी व सायंकाळनंतर हे पथक शहरात फेरी मारून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करीत असल्याने रस्तोरस्ती अतिक्रमणांचा बाजार करणाऱ्यांनी याचा धसका घेतला आहे.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार दहा दिवसांपूर्वी शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम नेहमीप्रमाणेच ठराविक कालावधीपुरतीच मर्यादीत राहील, अशी अपेक्षा अतिक्रमण करणाऱ्यांकडून व्यक्त होत होती.

नागरिकांतूनही या मोहिमेच्या कायमस्वरुपी कार्यवाहीबाबत साशंकता उपस्थित होत होती. परंतु मुख्याधिकारी भोसले यांनी संपूर्ण शहरातील प्रामुख्याने वर्दळीच्या ठिकाणी व न.प. मालकीच्या जागेवर झालेली अतिक्रमणे पूर्णपणे काढून टाकण्यासाठी पथक तयार केले आहे.

त्यामध्ये पथकाद्वारे सकाळी व सायंकाळी शहरात विविध ठिकाणी पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. परिणामी, शहरात व न.प. मालकीच्या जागेसह अन्य मोकळ्या जागांवर टपऱ्या व पथारी पसरून बसलेल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मध्यवर्ती बसस्थानक या मधल्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा टपऱ्यांनी अतिक्रमणे करून रस्त्यावरच बाजार मांडला होता. गेली अनेक वर्षे संबंधितांवर अनेकवेळा कारवाया झाल्या. मात्र, काही दिवसांनी पुन्हा हे व्यावसायिक मूळ स्वरुपात उभे राहात होते. परंतु न. प. प्रशासनाने आता कठोर कारवाई सुरू ठेवल्यामुळे गेले आठ ते दहा दिवस हा परिसर पूर्णतः अतिक्रमण मुक्त झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक समस्या, पादचाऱ्यांची सुरक्षा निर्धोक झाली आहे.

फिरते पथक आल्यावर व्यापाऱ्यांची पळापळ
शहरातील पानगल्ली परिसरात देखील पूर्णपणे रस्ता अतिक्रमणांनी वेढला गेला होता. कारवाईनंतर मात्र हळूहळू हा रस्ता मोकळा होत आहे. काही व्यापाऱ्यांच्या छुप्या पाठिंब्यावर अधूनमधून पानगल्ली परिसरात काही व्यापाऱ्यांचे रस्त्यावरच ठाण मांडून अतिक्रमण होत आहे. परंतु फिरते पथक आल्यावर हे व्यापारी आपापला माल घेऊन पळ काढतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 17/Mar/2025