मालगुंड क्र.१ शाळेला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट

गणपतीपुळे : मालगुंड बाजारपेठेतील १८५१ साली स्थापन झालेल्या जिल्हा परिषद आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड न. १ या शाळेचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे १७५ वे वर्ष आहे. या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने शाळेच्या इमारतीची कामे व डागडुजी संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष केळकर व सहकारी यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत नामदार उदय सामंत यांना शाळेच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनाप्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले व संबंधितांना तसे निर्देश दिले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विशाल लिंगायत, गिरीश बापट व दिनेश सुर्वे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उदय सामंत यांचे संतोष केळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. नामदार सामंत यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमची माहिती घेतली व शाळेच्या दैदीप्यमान वाटचाली बाबत त्यांनी संबंधितांचे विशेष कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 18/Mar/2025