राजापुरात मोटारसायकल रॅलीतून शिवगर्जना

राजापूर : राजापूर शहरातील शिवस्मृती मंडळाच्या वतीने रविवारी सकाळी शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन फेरीमध्ये शहरातील ५०० मोटार सायकलस्वारांनी सहभाग घेतल्याने शहरातील वातावरण भगवेमय झाले. सोमवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

राजापूर शहरातील शिवस्मृती मंडळ राजापूर यांच्यावतीने दरवर्षी शहरातील शिवस्मारकावर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी देखील शिवजयंतीनिमित्त शिवस्मृती मंडळ यांच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त रविवारी सकाळी वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एसटी डेपो येथे प्रथम धर्मध्वजाचे पूजन करण्यात येऊन ही वाहन फेरी कोदवली गुरववाडी, जकातनाका, जवाहर चौकातून बाजारपेठ मार्गे चिंचबांध, वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगण व परत बंदरधक्का, वैशंपायन पूल, गुजराळी बागकाजी, दिवटेवाडी, साखळकरवाडी ते जवाहर चौकातील शिवस्मारक अशी रॅली काढण्यात आली.

या वाहनफेरीत शहरातील महिलावर्गासह सुमारे पाचशे वाहनचालकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाने आपल्या मोटारसायकलला भगवा ध्वज लावला होता. प्रत्येकाने भगवा फेटा बांधल्याने राजापूर शहरातील वातावरण भगवेमय झाले होते. यावेळी वातावरण मंगलमय झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 18/Mar/2025