राजापुरात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरणास मुहूर्तच मिळेना

राजापूर : शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मोकाट जनावरांप्रमाणे भटक्या कुत्र्यांची समस्या भेडसावत आहे. राजापूर शहरामध्ये २००-२५०हून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. राजापूर शहरासह लगतच्या गावांमधील भटकी कुत्री बाजारपेठेत येतात. त्यानंतर, गावामध्ये परतण्याऐवजी भटकी कुत्री या ठिकाणीच ठाण मांडून आहेत. शहराच्या विविध भागामध्ये विशेषतः गर्दीच्या ठिकाणी भटकी कुत्री मोठ्या संख्येने वा झुंडीने फिरत असतात. सध्या शंभर ते दीडशेहून अधिक भटकी कुत्री असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

झुंडीने फिरणारे हे कुत्रे अचानक अंगावर धावून येतात तर, काहीवेळा वाहनचालकांचा पाठलागही करतात. या घटनांमुळे भटक्या कुत्र्यांची सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विशेषतः शाळकरी छोट्या मुली भटक्या कुत्र्यांच्या झुंडी पाहिल्यानंतर खूप घाबरून जातात. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या घटना यापूर्वी शहरामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी सर्वसामान्यांमधून केली जात आहे. मात्र, त्याकडे अद्यापही नगरपालिका प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. गेली दोन वर्षे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करताना पालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली होती; मात्र, वर्षभराचा कालवधी लोटला तरी, प्रशासनाला निर्बीजीकरण कारवाईस मुहूर्त सापडलेला दिसत नाही.

राजापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, त्याबाबतची निविदाही काढलेली आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल – प्रसाद महाडिक, राजापूर पालिका आरोग्य विभाग अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 18/Mar/2025