रत्नागिरी : ग्रामदैवत भैरीला पोलिसांची सशस्त्र सलामी; शिमगोत्सवाचा जल्लोषात समारोप

रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला रत्नागिरीतील झाडगाव सहाणेवर रत्नागिरी पोलिसांतर्फे चार शस्त्रधारी पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली. ही ऐतिहासिक परंपरा अनुभवण्यासाठी शेकडो रत्नागिरीकरांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली होती. ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या प्रथेला तब्बल 125 वर्षांचा इतिहास आहे. या प्रसंगी ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळी आणि बारा वाड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री देव भैरी जोगेश्‍वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्‍वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाचा समारोप आज रंग खेळून आणि नियोजित ग्रामप्रदक्षिणेने जल्लोषात झाला. होळीच्या रात्री 12 वाजता भैरीबुवाची पालखी वाजत-गाजत मंदिराबाहेर आली आणि मध्यरात्री 12 च्या सुमारास पुन्हा मंदिरात स्थानापन्न झाली.

यानंतर गार्‍हाणे घालण्यात आले आणि रंगतदार शिमगोत्सवाची सांगता झाली.सहाणेवर नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी दिसून आली. आज सकाळपासूनच पालखी उठणार असल्याने भाविकांची संख्या वाढत गेली. दुपारी भैरीबुवाच्या पालखी आणि बरोबर उभ्या केलेल्या होळीच्या शेंड्यावर गुरव मंडळींनी धुपारती केली. त्यानंतर गार्‍हाणे घालण्यात आले. यानंतर पोलिसांनी सशस्त्र सलामी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 19/Mar/2025