राजापूर : ‘ई-पीक’ नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

राजापूर : शेतात लागवड केलेल्या पिकासह शेतातील अन्य नोंदी यापूर्वी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांमार्फत केल्या जात होत्या. सध्या पीक पेरणीच्या नोंदी शेतकरी अॅन्ड्रॉईड मोबाईलवरून विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी अॅप’द्वारे करत आहेत. हायटेक पद्धतीमुळे पिकपेऱ्याची नोंद करणे अधिक सुलभ झाले असले, तरीही या नोंदणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

राजापूर तालुक्यातील २३७ महसुली गावांमध्ये सुमारे ३ लाख १८ हजार ९४९ सात-बारा उतारे आहेत. त्यात केवळ १३४ शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ अॅपद्वारे खरीप हंगामातील पीकपेऱ्याची नोंद केली आहे. त्यातून २१८.९८ हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे; मात्र २३७ महसुली गावांपैकी ७७ गावांमधील शेतकऱ्यांनी नोंद केली असून, १६० गावांमधील शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. सात-बारा उताऱ्यावर दरवर्षी सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच्या पिक पेऱ्याची नोंद करणे शक्य झाले आहे. अॅपद्वारे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची माहिती स्वतः भरावयाची आहे. पिकपेरा नोंदीचे डिजिटलायझेशन करताना ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होते; मात्र प्रत्यक्षात ई-पीकपेरा नोंद कमी झाली आहे

मोबाईल अॅपद्वारे शेताची ई-पीकपेरा नोंद करणे गरजेचे आहे: मात्र गावात मोबाईल नेटवर्क नाही. कधी नेटवर्क असल्यास साईटचा सर्व्हरडाऊन असतो. अशा स्थितीत पीकपेरा करायचा कसा, हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. कृष्णा शिंदे, शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 05/Oct/2024