लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

“लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही” असं म्हटलं आहे. तसेच “मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसतं भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात” असं म्हणत पंतप्रधानांचं भरभरून कौतुक केलं आहे.

“बंजारा विरासतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं आहे. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. तुम्ही भाग्यवान आहात. रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, की पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं. पण तो योग इतर कोणाच्या नशिबात आला नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशिबात तो योग होता.”

“बंजारा समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे. भारताला महाशक्ती बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही कारण मोदींजीचा प्रभाव तेवढा वाढत आहे. मोदीजी देशाची शान आहेत. मोदीजींच्या प्रेरणेने, आशीर्वादाने राज्याच्या विकासाला स्पीड आला आहे. गती आली आहे. डबल इंजिन सरकारचं काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे. ऐतिहासिक कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.”

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे. दोन कोटींहून जास्त असलेल्या आमच्या बहिणींच्या खात्यात तीन हप्ते जात आहेत. विरोधक म्हणतात आम्ही ही योजना बंद करू परंतु कोणीही लाडकी बहीण योजना कधीच बंद करू शकणार नाही. कारण ही योजना आमच्या गोरगरीब बहिणींसाठी आहे. डबल इंजिन सरकार सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे. आपलं सरकार हे त्यामुळेच लाडकं सरकार झालं आहे.”

“मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, नुसतं भाषण देऊन जात नाहीत. ते भरभरून देऊन जातात. ते आमच्याकडून काम करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देऊन जातात. हा त्यांचा मोठेपणा आहे. परंतू त्यानंतरही विरोधक टीका करत राहतात. मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मोठा इतिहास आहे. नवनवीन निर्णय, कामं ही मोदीजींच्या काळात होतात” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:42 05-10-2024