सोमवारीपासून पहिली भुयारी मेट्रो धावणार

मुंबई : मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. लोकार्पणानंतर आरे – बीकेसी टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एमएमआरसीएल) हा टप्पा प्रवाशांसाठी सोमवारपासून खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता आरे – बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी ११ ते रात्री ११.३० या वेळेत भुयारी मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भुयारी मेट्रो प्रवासासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एमएमआरसीएलकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम सुरू आहे. ही संपूर्ण मार्गिका आतापर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, कारशेड वाद आणि संथ गतीने सुरू असलेले काम यामुळे या मार्गिकेस विलंब झाला आहे. पण आता मात्र मुंबईकरांची भुयारी मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा अवघ्या काही तासात पूर्ण होणार आहे. बीकेसी येथील बीकेसी मेट्रो स्थानकावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान आरे – बीकेसी मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. यावेळी ते बीकेसी मेट्रो स्थानक – सांताक्रुझ मेट्रो स्थानक असा भुयारी मेट्रो प्रवास करणार आहेत. एकूणच मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याने भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकर आतुर झाले आहेत. शनिवारी रात्री वा रविवारी सकाळी मुंबईकरांची ही आतुरता संपुष्टात येईल असे वाटत होते. मात्र एमएमआरसीएलने मुंबईकरांच्या भुयारी मेट्रोच्या प्रवासाची प्रतीक्षा काहीशी लांबवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 05/Oct/2024