‘श्री जय भैरव चषक’ राज्यस्तरीय सिझन बॉल टी-२० स्पर्धेचे शानदार उद्घाटन

रत्नागिरी : रत्नागिरी येथून दर्जेदार क्रिकेटपटू घडावेत व रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींना मुंबई, पुणे, गोवा येथील खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळावा, या एकमेव उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रत्नागिरीतील खेळाडूंसाठी कोळंबे येथील सावंत स्टेडियमवर (सोसा) येथे दिनांक २१ मार्च ते ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यस्तरीय ‘श्री जय भैरव’ चषक खुली टी-२० सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे आयोजित करणेत आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी शानदार पद्धतीने पार पडला.

सदर स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरीतील प्रतिथयश उद्योजक व अरिहंत बिल्डर्सचे सर्वेसर्वा श्री. सुरेश गुंदेचा यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर प्रसंगी समर्थ रोडलाईन्सचे व स्पर्धेचे प्रायोजक श्री. गजेंद्र पाथरे, श्री. अथर्व पाथरे, तसेच ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक श्री. रमेश कसबेकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री. लाल्याशेठ खातू, श्री. सुभाषराव पटवर्धन, श्री दिवाकर मयेकर व मंगलमूर्ती प्रतिष्ठान व श्रीराम मंदिरचे श्री. सुधाकर सावंत, श्री. दीपक राऊत, श्री. संदीप डोंगरे, सावंत क्रिकेट अॅकॅडमीचे श्री. केतनशेठ सावंत, त्याचप्रमाणे स्पर्धेचे संयोजक श्री. दीपक देसाई यांचे उपस्थितीत पार पडले. सदर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्री. संजय वैशंपायन यांनी उत्कृष्टरित्या केले.

सदर उद्घाटन समारंभाप्रसंगी ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री. सुभाष पटवर्धन यांनी प्रास्तविक केले व सदर स्पर्धेचे संयोजक श्री. दीपक देसाई यांनी त्यांच्या मनोगतामध्ये स्पर्धेचा हेतू व उद्देश स्पष्ट करताना रत्नागिरीतील क्रिकेट हे वाढीव लागावे व उत्तमोत्तम क्रिकेटपटू रत्नागिरीतून घडावेत असे नमूद केले. सदर उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री. सुरेश गुंदेचा यांनी सदर क्रिकेट स्पर्धेला सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

तसेच सकाळच्या सत्रातील फाईट इलेव्हन मिऱ्या रत्नागिरी विरुद्ध रत्नागिरी वॉरियर्स यांच्यातील सामना श्री. सुरेश गुंदेचा यांचे हस्ते नाणेफेक होवून सुरू करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये फाईट क्लबने ६ धावांनी रत्नागिरी वॉरियर्सवर विजय मिळविला, फाईट क्लब संघातील मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी कु. सम्यक जाधव याला देण्यात आला. तर दुपारच्या सत्रातील शॅडो स्पोर्ट्स रत्नागिरी विरुद्ध नवी मुंबई हंटर्स यांच्यात सामना होवून त्या सामन्यामध्ये नवी मुंबई हंटर्सने ४ विकेट्सने विजय मिळविला. तर मुंबई हंटर्स संघातील कु. ऋषी चावरे याला मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 24-03-2025