रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील 238 सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. काही दुर्गम भागातील सहकारी संस्थामध्ये नेट कनेक्टिव्हिटीच्या तांत्रिक अडचणी आहेत. या संस्था नेट कनेक्टिव्हिटीपासून वंचित आहेत. त्यांना खासगी तत्त्वावर कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे या सेवा सहकारी संस्था ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्याचा प्रत्यक्ष लाभ स्थानिक शेतकर्यांना होणार आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचे काम केंद्रामार्फत सुरू असून, त्या माध्यमातून सहकारी संस्थांना अनेक शासकीय योजनांचा लाभ शेतकरी बांधवांपर्यंत पोचवणे शक्य होणार आहे. यासाठी या सेवा सह. संस्थांचे संगणकीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेत आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील 238 सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून सभासदांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्डमार्फत वित्तपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण असून, यामुळे गावपातळीवरील शेतकरी सक्षम होण्यास मदत होणार आहे.
सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त असलेले अनेक मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. सहकार विभागामार्फत या सर्व निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व्हाव्यात आणि त्या कार्यक्षमपणे चालू राहाव्यात, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत कोकणातील साडेपाच हजारांहून अधिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. या सोसायट्या आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना पतपुरवठा करण्याबरोबरच विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा करणे, हा यामागील उद्देश आहे. निर्णयांनुसार या संस्थांचे संगणकीकरण केले जात आहे. यासाठी त्यांच्याविषयी असलेल्या कायद्यातील पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे या संस्थांची बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा स्वनिधीच्या 10 पटीऐवजी 25 पट झाली आहे. या संस्थांना 152 प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 05-10-2024