दापोलीत निधीअभावी जलजीवन योजनेची कामे रखडली

दापोली : दापोलीत महत्वाकांक्षी जलजीवन मिशन पाणी योजना निधीअभावी रखडली आहे. मागणी तीन वर्षे योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असून ठेकेदारही मेटाकुटीला आले आहेत. या योजनेला केंद्र शासन आणि राज्य शासन असा निधी मिळतो. मात्र, राज्याचे तिजोरीत खडखडाट असल्याने ठेकेदारांनी सादर केलेली कामांची बिले सहा महिन्यांपासून रखडली आहेत. निधीअभावी योजनांची कामे करताना ठेकेदारांना आर्थिक अडचणी भेडसावत आहेत.

मिशन निर्धारित कालावधीत पूर्ण करायचे असल्याने प्रशासनाकडून कामांना गती देण्यासाठी ठेकेदारांवर दबाव वाढतो आहे. तर नागरिकदेखील ही योजना पूर्ण व्हावी म्हणून रेटा लावत आहेत. योजनेची कामे अपूर्ण असल्याने ग्रामसभेत या एकाच विषयावर तासन्तास सभा चालत आहेत.

दरम्यान, बिले काढली, तरच पुढची कामे करणे शक्य होईल, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. यंत्रणेकडून कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ठेकेदारांना कामाची गती वाढविण्यास सांगितले जात आहे. मुदतीत काम पूर्ण न केल्यास ठेकेदार यांना जबाबदार ठरविले जात आहे. मिशन वेळेत पूर्णत्वासाठी दबाव आणला जात असताना ठेकेदारांसाठी जिल्हा परिषदेकडे पैसाच नसल्याचे समोर येत आहे. मागील सहा महिन्यांपासून ठेकेदारांनी सादर केलेल्या बिलांचा गठ्ठा वाढता आहे.

पैसा नसल्याने बिले मार्गी लावायची कशी, असा पेच प्रशासनासमोर पडला असल्याचे चित्र आहे. दापोली तालुक्यात १५७गावांसाठी १७७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, निधीअभावी सगळ्याच योजना रखडल्या आहेत. जलजीवन मिशन ही केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

ही योजना मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. मात्र, जि.प.ने हाती घेतलेल्या जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. आता मार्चनंतर तरी ठेकेदार यांना निधी मिळेल का, याकडे लक्ष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 25/Mar/2025