मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने आता अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर निशाणा साधलाय. कामराने आज एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना ‘सॅलरी चोरणारी दिदी’ असं म्हटलंय. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये केलेल्या कार्यक्रमाचाच हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना ‘साडीवाली दिदी’ म्हणत कामराने त्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्हिडिओ केल्यानंतर कुणाल कामरा वाद सापडलाय. गाण्यातून शिंदेंवर टीका केल्याने शिवसैनिकांकडून त्याला धमकी दिली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेला व्हिडिओची चर्चेत असताना त्याच्या नवीन व्हिडिओची क्लिप व्हायरल होत आहे. अर्थमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडिओ दीड मिनिटांचा आहे.
हिंदी चित्रपटातील ‘हवा हवाई’ गाण्यावरून कुणाल कामराने अर्थमंत्र्यांच्या आर्थिक धोरणांवर टीका केलीय. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांवर विडंबनात्मक काव्य करत त्यांच्यावर टीका करण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कामराला नोटीस दिलीय. याआधीही मंगळवारी त्याला नोटीस बजावण्यात आली होती. रविवारी एका कार्यक्रमात कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता ‘देशद्रोही’, ‘ठाणे की रिक्षा’ अशी टीका केली होती. या कार्यक्रमानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा एक गाण्याचा व्हिडिओ व्हायरल करत कामराने शिवसेना आणि सरकारला डिवचलं होतं.
कामरावर काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण मर्यादा असली पाहिजे.’ कुणाल कामराने ‘दिल तो पागर है’ या चित्रापटातील ‘भोली सी सूरत’ या गाण्यावर विडंबनात्मक गाणे गायले. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. कामराने कोणाचंही नाव घेतलं नाही पण ज्या पद्धतीने त्याने दाढी, ठाणे आणि रिक्षा असे शब्द वापरले त्यावरुन त्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत असल्याचं शिंदे म्हणाले होते. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीय. नाशिकच्या मनमाड पाठोपाठ नांदगाव पोलिसात आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना शहर नांदगाव यांच्यावतीने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 26/Mar/2025














