मुंबई, 26 मार्च 2025 – महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, ज्यांना सत्तेची मस्ती आणि मुजोरी आहे, त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, तिची शान आणि सभ्यता जपणे किंवा लोकशाहीचे संवर्धन करणे याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे,” असे सणसणीत टीकास्त्र सोडत भास्कर जाधव यांनी सरकारला खड्ड्यात घेतले.
सरकारवर टीकेची झोड
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर माझा खूप विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर प्रेम करणारे आणि ती जपणारे नेते आहेत, असे मला वाटत होते. ते सातत्याने म्हणत होते की, आमची संख्या कमी असली तरी त्याचा विचार करणार नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबतही ते सूचक बोलतील अशी अपेक्षा होती. पण या लोकांचा संसदीय कार्यप्रणालीवर आणि घटनेवर विश्वासच नाही. त्यांच्याकडे फक्त सत्तेचा माज आणि मस्ती आहे.”
विधानसभा अध्यक्षांवरही प्रश्नचिन्ह
जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही बोट ठेवले. “विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत, तसेच अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी मनमानी निर्णय घ्यायचे नसतात. सभागृहातील प्रथा, परंपरा आणि नियमांनुसारच त्यांनी वागायला हवे. घटनेने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत. मी काहीही चुकीचे केले नाही. पण या लोकांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, विधिमंडळही मान्य नाही,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
“लोकशाही मातीत घालायचं ठरवलंय”
भास्कर जाधव यांनी सरकारच्या कार्यशैलीवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी ठेवायची काय किंवा सगळ्या खुर्च्या विकत घेऊन रिकाम्या करायच्या काय, सध्या तेच सुरू आहे. संविधानावर चर्चा करताना मी सांगितलं होतं की, पूर्वी गोरगरिबांना दारू-मटण देऊन मते घेतली जायची, आता ईव्हीएममधून मते घेतली जातात. ज्यांची नावं यादीत नाहीत, ती मते वाढवली जातात. लोकशाही मातीत घालायचं ठरवलंय, त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही.”
“चूक असेल तर हजारवेळा करेन”
जाधव यांनी आपली भूमिका ठामपणे मांडताना म्हटले, “उपाध्यक्षांची निवड तुम्ही करता, तुमच्या मनात असतं, तर विरोधी पक्षनेत्याचीही निवड केली असती. माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल, पण मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो, प्रथा-परंपरेवर बोलतो. चुकीचं काही सुरू असेल तर ते रोखण्याचा प्रयत्न करतो. प्रथा-परंपरांचं रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा, हे सांगणं चुकीचं असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन.”
राजकीय वातावरण तापलं
भास्कर जाधव यांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, यावर सरकार काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













