संगमेश्वर : कसबा येथे शिंपणे उत्सव उत्साहात

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा संगमेश्वर येथील देवी जाखमातेचा शिंपणे उत्सवाचा खेळ शुक्रवारी (ता. २८) दिवसभर अपूर्व उत्साहात, लाल रंगाची मनसोक्त उधळण करत व मटण-भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेत संपन्न झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली. आज दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा संगमेश्वर येथील सर्व रस्ते लाल लाल होऊन गेले होते.

काल सकाळी ६ वाजल्यापासूनच शिंपणे उत्सवातील लाल रंगाच्या उधळणीला सुरुवात झाली. दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला. कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरुवात झाली. दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात येतो.

या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणाऱ्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्धरितीने मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले. कसबा व संगमेश्वर येथे शिंपणे उत्सवामध्ये लहान मुलांना पाण्यामध्ये डुंबण्यासाठी पाण्याचे मोठे हौद बांधण्यात आले होते. दिवसभर या हौदात साठवण्यात आलेल्या पाण्यात मुलं मनसोक्त डुंबत होती. उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट केली होती. प्रसाद वाटपानंतर उत्सवाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 29/Mar/2025