राजापूर : माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणाऱ्या तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने खरवते गावचे स्वतःचे अद्ययावत संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर खरवते गावची मुबलक निसर्गसंपदा, जैवविविधता, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसास्थळे, जलव्यवस्थापन, उद्योग व्यवसाय आदींसह खरवते गावच्या सर्वांगीण माहितीसह गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम यांचा समावेश आहे.
राज्यभर राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमां’तर्गत जैवविविधता आणि गावाची माहिती देणारे स्वतःचे संकेतस्थळ बनविणारी राजापुरातील पहिली आणि जैविविधतेचे संकेतस्थळ विकसित करणारी दुसरी ग्रामपंचायत ठरण्याचा मानही खरवते ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. या संकेतस्थळाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी नीलेश जगताप, खरवतेचे सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर आदी उपस्थित होते. गावची सर्वांगीण माहिती देणारे विकसित केलेले संकेतस्थळ आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ८५ उपक्रमांचे विकसित केल्याबद्दल आमदार सामंत यांनी खरवते ग्रामपंचायतीचे कौतुक केले. खरवते गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
संकेतस्थळावर काय पाहाल ?
खरवते गावाविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती, मंदिरे व श्रद्धास्थाने, ग्रामपंचायत कामकाज, गावातील उद्योग-व्यवसाय, गावातील शैक्षणिक सुविधा, ऐतिहासिक वारसास्थळे, जलव्यवस्थापन, जैवविविधता, देवराईच्या रूपाने नैसर्गिक जंगल कुठेकुठे आहेत याच्या सविस्तर नोंदी आणि माहिती या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्याचवेळी गावच्या विविधांगी माहितीसंबंधी व्हिडीओही प्रकाशित करण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 31/Mar/2025














