Pakistani Actor Fawad Khan Upcoming Movie Abir Gulaal: पाकिस्तानी चित्रपट (Pakistani Movies) आणि टीव्ही स्टार फवाद खानचा (Favad Khan) कमबॅक हिंदी चित्रपट (Hindi Movie) ‘अबीर गुलाल’ (Abir Gulaal) चा टीझर रिलीज झाला आहे.
ही एक प्रेमकहाणी आहे. चित्रपट 9 मे रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. काही सेकंदांच्या टीझरमध्ये पाकिस्तानी चित्रपटाची झलक पाहायला मिळतेय. पण, आता पाकिस्तानी स्टार फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भारतात रिलीज केल्या जाणाऱ्या पाकिस्तानी चित्रपटाविरोधात मनसेनं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानी कलाकाराचा ‘अबीर गुलाल’ प्रदर्शित होऊच देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलं आहे.
पाकिस्तानी कलाकाराचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या अमेय खोपकरांनी दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अशातच, तो ‘अबीर गुलाल’मध्ये’ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पाकिस्तानी कलाकारांना खुशाल डोक्यावर घ्या,पण सामना आमच्याशी आहे, असा इशाराही अमेय खोपकरांनी दिला आहे. यासंदर्भात अमेय खोपकरांनी ट्वीटही केलं आहे.
इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच : अमेय खोपकर
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, “पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.”
यापूर्वीही फवादच्या चित्रपटांना मनसेनं केलाय विरोध
फवाद खान परतण्यापूर्वी त्याच्या ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाबाबत बराच वाद झाला होता. भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पाकिस्तानी कलाकारांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असं सांगून विरोध केला. आता ‘अबीर गुलाल’ मध्येही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘अबीर गुलाल’च्या रोमॅन्टिक कॉमेडी टीझरमध्ये फवाद आणि वाणीची जोडी
फवाद खान आणि वाणी कपूर अभिनीत या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये, फवाद, वाणी कपूरसमोर त्याची गायकीची प्रतिभा दाखवताना दिसतो. हे दृश्य लंडनमधील पावसात ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या एका कारमध्ये चित्रित करण्यात आलं आहे. टीझरच्या शेवटी, वाणी फवादला विचारते, “तू माझ्यासोबत फ्लर्ट करत आहेस का?’ उत्तरात फवाद म्हणतो, ‘तुला तेच हवंय का?”
‘अबीर गुलाल’चं चित्रीकरण 29 सप्टेंबर रोजी लंडनमध्ये सुरू झालं आणि त्याचं दिग्दर्शन आरती एस. बागरी यांनी केलं आहे. विवेक अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी हे या सिनेमाचे निर्माते आहेत. या चित्रपटात भारत आणि ब्रिटनमधील अनेक महान कलाकार सहाय्यक भूमिकेत दिसतील.
दरम्यान, फवाद खाननं 2014 मध्ये ‘खूबसूरत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्यानंतर त्यानं ‘कपूर अँड सन्स’ (2016) आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ (2016) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. आता आठ वर्षांनंतर, तो पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज झाला आहे. पण, एकंदरीतच फवादच्या चित्रपटाला मनसेचा वाढता विरोध पाहता, बहुतेक महाराष्ट्रात ‘अबीर गुलाल’ वादाच्या भोवऱ्यात अडकणार, हे स्पष्ट झालं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 02-04-2025













