पुणे : राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा सीबीएसई) पॅटर्न लागू होणार आहे. मग राज्य मंडळ बंद होणार का ? अभ्यासक्रमात ‘मराठी’ला स्थान राहणार का? राज्याच्या संस्कृतीचा उल्लेख अभ्यासक्रमात नसणार का? असे नानाविध प्रश्न उपस्थित होत नाहेत. या पार्श्वभूमीवर हजारो शिक्षक, पालकांच्या नात दडलेल्या अशा प्रश्नांची राज्य सरकारचा शालेय शक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद यांच्याकडून मिळालेल्या उत्तरातून कलेली उकल.
‘सीबीएसई पॅटर्न’ स्वीकारल्याने राज्य मंडळ बंद होणार का ?
अजिबात नाही. राज्याचे अस्तित्व दाखविणारे राज्य मंडळ बंद होणार नाही. याउलट ते आणखी सक्षम होईल. २१ व्या शतकातील गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये आणण्यास ते मदतच करेल. राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडेच असेल.
‘सीबीएसई कार्यपद्धतीप्रमाणे राज्य मंडळाच्या शाळांचे व्यवस्थापन, परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक अशा कार्यपद्धतीत बदल होतील. ‘सीबीएसई मधील चांगल्या गोष्टी राज्य मंडळ स्वीकारेल, याद्वारे राज्य मंडळाचा दर्जा आणखी सुधारेल आणि उंचावेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि प्रगतीत सुधारणा होईल.
‘सीबीएसई पॅटर्न ‘नुसार अभ्यासक्रमात नेमके काय बदल होणार?
‘सीबीएसई चा अभ्यासक्रम, त्यातील आशय आणि आशयाचा वापर करण्याविषयीच्या सूचना स्वीकारण्यात येतील. परीक्षा पद्धतीत बदल होतील. मात्र विद्यार्थ्यांना आंतरशाखीय, वेगळ्या प्रकारचा विचार करायला लावणारे प्रश्न परीक्षेत विचारले जातील. ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातील विज्ञान आणि गणित विषय हे राज्य मंडळात तसेच वापरले जातील, परंतु या विषयातील उदाहरणे तसेच आशय हा राज्य मंडळाला पूरक असेल. सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम राज्यानुसार तयार केला जाईल.
नव्या ‘पॅटर्न’ नुसार बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाचे स्वरूप कसे असेल?
पाठ्यपुस्तकांच्या मांडणीत राज्य मंडळाचे स्वातंत्र पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. सीबीएसई नुसार अभ्यासक्रम आशय असला तरी पाठ्यपुस्तकांच्या मांडणीत सुधारणा आणि आवश्यक बदल करण्यात येतील, राज्य मंडळाप्रमाणे मांडणी, चित्रे, उदाहरणे असतील, राज्यानुसार चित्र, उदाहरणे बदलण्यात येतील. सीबीएसई ‘एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमावर आधारित राज्य मंडळाचे स्वतंत्र पाठ्यपुस्तक असेल.
महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, भौगोलिक महत्त्व, इतिहास यांना पाठ्यपुस्तकात स्थान असेल का ?
महाराष्ट्राला संत-समाजसुधारकांची मोठी परंपरा लाभली आहे. नवीन अभ्यासक्रमात राज्याची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा अशा संबंधित विषयांमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
‘सीबीएसई पॅटर्न ‘मध्ये मराठीचे अस्तित्व टिकणार का?
राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य केले आहे. मराठी भाषा विषयाचे महत्त्व कोठेही कमी होणार नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला सन्मानाचेच स्थान मिळणार आहे.
‘सीबीएसई पॅटर्न’ स्वीकारताना ‘सीबीएसई प्रमाणे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळणार का ?
शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्ग खोल्या, क्रीडांगण, कुंपण अशा भौतिक सुविधांसंदर्भात आराखडा तयार केला जात आहे. यावर प्राधान्याने काम करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
सरकारी शाळांमधील मोफत शिक्षणाचा निर्णय कायम राहणार का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि राज्य सरकारची मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील मुलांना दहावीपर्यंतचे आणि मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफतच दिले जाते आणि ते तसेच कायम राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 02/Apr/2025













