चिपळूण : टेरवमधील कामे अपूर्ण; सरपंच किशोर कदम यांचा १४ एप्रिलला आत्मदहनाचा इशारा

चिपळूण : तालुक्यातील टेरव गावात शासनाने विविध विकास योजना मंजूर केल्या, तशी शासन मंजुरी देखील मिळाली. परंतु निधीअभावी सर्व कामे अपुरी राहिली आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वेळेत शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा न केल्याने कामे प्रलंबित राहिली. याबाबतची चौकशी करावी, या मागणीसाठी १४ एप्रिल रोजी टेरव सरपंच किशोर कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

सरपंच किशोर कदम यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यानुसार टेरवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी शासनाने समिती गठीत करून जिआर काढला. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी या समितीच्या बैठकीचे आयोजन केलेले नाही, याला जबाबदार कोण? या समितीची शासकीय बैठक घ्यावी.

जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना टेरव व टेरव बु तसेच टेरव वेतकोंड स्वतंत्र नळपाणी योजनेच्या कामाला दोन वर्षात न्याय मिळालेला नाही. महसूल विभाग योग्य ती कार्यवाही व मार्गदर्शन का करत नाही. सौर लाईट प्रस्ताव अपूर्ण राहिल्याने गावात योजना मंजूर होवून सुद्धा विद्युत विभागामार्फत त्याचा ग्रामस्थांना लाभ मिळत नाही.

टेरव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्या ऐवजी तक्रारदार व विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांना प्रशासनाकडून झुकते माप दिले जाते. खासदार नारायण राणे यांनी टेरव देवस्थानकरिता ‘अ’ दर्जाबाबत पोलिस अधिक्षकांना सूचना देऊन अद्याप दाखला मिळालेला नाही. राष्ट्रीय महामार्ग अभियंता यांनी मुंबई गोवा हायवे रस्त्या लगत काम करताना कामथे फाटा येथे निवारा शेड व सौर लाईट मान्य केले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

मुंबई गोवा हायवे ते वेतकोंड मार्गे टेरव बु. अडरे मार्ग चिपळूण कराड मार्गे झाल्याने गावाचे आणी शहराचे १० ते १२ कि. मि. चे अंतर वाचणार आहे. संबधीत मार्गाचे सर्वेक्षण होवून अंदाजपत्रके सादर व्हावेत. गावच्या विकासासाठी गेल्या २० ते २५ वर्षात सदस्य, उपसरपंच आणि सध्या सरपंच म्हणून पाठपुरावा चालूच आहे. मात्र प्रशासन याची दखल घेत नसल्याकारणाने नाईलाजास्तव आत्मदहन करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सरपंच कदम यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 04/Apr/2025