संस्कृती वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान : आण्णासाहेब मोरे

रत्नागिरी : भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता वैभवाकडे नेण्यासाठी कोकणचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी काढले. तेव्हा उपस्थित हजारो सेवेकऱ्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून स्वामी नामाचा प्रचंड जयघोष केला.

विश्वशांती, राष्ट्रहित आणि समाज कल्याणासाठी गुरुमाऊली श्री. मोरे यांच्या पावन सानिध्यात रत्नागिरीमध्ये महासत्संग सोहळा तथा सामूहिक श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनाची अतिउच्च सेवा अपूर्व उत्साहात आणि सेवेकऱ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडली. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, गुरुमाता मंदाताई तथा काकूसाहेब मोरे यांची विशेष उपस्थिती होती.

अमृततुल्य हितगुजमध्ये गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले, कोकणची संस्कृती गौरवपूर्ण आहे. कोकणात पहाट झाली की, सडासंमार्जन करून दाराभोवती सुंदर रांगोळी रेखाटली जाते. घरात आलेल्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले जाते.

अनेक लोकोत्तर महापुरुष कोकणात होऊन गेले. स्वामी चरित्रातील अनेक सत्पुरुष हे देखील कोकणातीलच आहेत. कोकण ही नररत्नांची खाण आहे ग्रामदेवतांचे सर्वाधिक मानसन्मान हे देखील कोकणातच होतात.

असा निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या कोकणात पूर्वी येणे-जाणे होत असे. आता कार्य बाहुल्यामुळे एक तपानंतर येण्याचा योग आला. अशा शब्दांत गुरुमाऊली श्री मोरे यांनी कोकणभूमीचा गौरव केला. आदर्श, निव्र्व्यसनी पिढी घडविणे हा स्वामी कार्याचा पाया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सेवाभावी मानवतावादी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहावेत, अशी भावना व्यक्त केली. आज केवळ परमपूज्य गुरुमाऊलींचे आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हापूस आणि लाडूंची तुला
परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कोकण विभाग समितीतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त परमपूज्य गुरुमाऊलींची हापूस आंबा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या लाडूच्या प्रसादाची तुला करण्यात आली. गुरुमाता सौ, काकूसाहेब मोरे यांनी गुरुमाऊलीचे औक्षण केले तेव्हा हजारो सेवेकऱ्यांनी हात उंचावून गुरुमाऊलींना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली आणि तुला संस्कार होत असताना स्वामीनामाचा जयजयकार करून वातावरण दुमदुमून टाकले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 04/Apr/2025