मुख्यमंत्री ग्रामसडक योजना: रत्नागिरी जिल्ह्यातील १२० किमी रस्त्यांचे होणार डांबरीकरण; १९० कोटी मंजूर

रत्नागिरी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यातील ३९ रस्त्यांची कामे घेण्यात आली आहेत.

यामुळे जिल्ह्यातील १२०.५४५ किमीचे डांबरीकरण होणार आहे. यासाठी १९० कोटी मंजूर झाले आहेत तर या रस्त्यांच्या १० वर्षे देखभाल दुरूस्तीसाठी अंदाजित दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते आता दर्जेदार होणार आहेत. राज्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि रस्त्याने न जोडलेल्या उर्वरित वाड्यावस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काही रस्त्याची कामे झाली आहेत; परंतु यामध्ये अंतर्भूत न झालेल्या अस्तित्वातील दूरवस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ३९ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, दापोली, खेड, मंडणगड या तालुक्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याची सुमारे १२०.५४५ किमीच्या रस्तांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी १० वर्षांचा कालावधी देण्यात आला असून त्यासाठी १० कोटींच्यावर तरतूद करून ठेवण्यात आली आहे.

चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील कडवई विकास नगर ओकटेवाडी रस्ता, गोळवली रोड शेंबवणे महादेवाडी रस्ता, कडवई घोसाळकरवाडी कुंभारवाडी रस्ता, कर्ली गावठाणवाडी ते देवधर रस्ता, रामा १७ ते गोळवली ते खामकरवाडी रस्ता, धामापूर, मावळंगे, मांडवकरवाडी, आंबेट, माखजन रस्ता, धामापूर भायजेवाडी आदी रस्त्यांचा समावेश आहे तर रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात दांडेआडोम ते भावेआडोम रस्ता, भोके आंबेकरवाडी ते बुद्धवाडी रस्ता, चवे ओलपाटवाडी ते निवईवाडी रस्ता, गणेशगुळे ते कुर्धे मेर्वी रस्ता, टेंभ्ये भैरीजुगाई मंदिर ते खाडेवाडी रस्ता, कुर्ली मराठवाडी कसोप वायंगणी समुद्रीमार्गाचा रस्ता, हरचेरी नवेट रस्ता, मेढेतर्फे फुणगूस ते चांभारवाडी गोताडवाडी जोडरस्ता आदी रस्ते तर दापोली, खेड, मंडणगडमधील आंबये नातूनगर रस्ता, निळवणे बौद्धवाडी कातळवाडी रस्ता, भडवळे वावघर फरारे रस्ता, वेळवी ते धनकोली रस्ता, दाभोळे भिवबंदर ते आघारी तिवरेवाडी रस्ता, आसोंड उर्फी बोरीचाकोंड आदी रस्त्यांचा यामध्ये समवेश आहे. या रस्त्यांची कामे झाल्यास जिल्ह्यातील १२०.५४५ किमीचा रस्ता डांबरीकरण होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 28-04-2025